ठाणे- विधानसभेचे पडघम वाजू लागले आहेत. यामुळे राज्यात अनेक इच्छुक मंडळी आपल्यालाच विधानसभेचे तिकिट मिळावे याकरता गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. ठाण्यात ठाणे शहर विधानसभा मतदार संघातही हीच परिस्थिती आहे.
२०१४ ला युती झाली नसल्याने ठाणे शहर विधानसभा मतदार संघात सेना भाजपात उमेदवारीवरून रस्सी खेच सुरू झाली आहे. ठाणे हे शिवसेनेचे असून ठाण्यातील सर्व ३ ही विधानसभा शिवसेनेलाच द्याव्यात अशा चर्चांना आता वेग आला आहे. तर दुसरीकडे मात्र सेना भाजपातील अनेकजण या ठिकाणाहून आपल्यालाच उमेदवारी मिळावी याकरता जोर लावताना दिसत आहेत.
भाजपचे संजय केळकर हे या मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत. २०१४ विधानसभा निवडणूकीला युती न झाल्याने संघाचे पायीक संजय केळकर यांना भाजपने ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून रिंगणात उतरवले आणि संजय केळकर १२ हजार ५८८ मतांनी निवडून आले होते. त्यानंतर जवळपास ५ वर्षांचा कार्यकाल लोटला. या दरम्यान युतीत सुरू असलेले खलबते यामुळे पुन्हा एकदा युती न झाल्यास आपल्याला उमेदवारी मिळेल अशी अनेकांना आशा आहे. त्यामुळे या मतदार संघाच्या उमेदवारी वरुन सेना भाजपातच जोरदार रस्सी खेच सुरू आहे.
हेही वाचा - कल्याण पश्चिम विधानसभा जागेसाठी शिवसेनेची खेळी की सेनेला धक्का?
शिवसेनेचे विधान परिषद आमदार रविंद्र फाटक हे या मतदार संघातून इच्छुक आहेत. तर यांच्या पाठोपाठ कमीत कमी वेळात लोकप्रिय झालेल्या ठाणे मनपा महापौर मिनाक्षी शिंदे, ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते अनंत तरे, नगरसेवक संजय भोईर ही शिवसेनेची मंडळी ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून इच्छुक आहेत.
हेही वाचा - टोलमुक्तीसाठी सुप्रिया सुळे उतरणार रस्त्यावर
उमेदवारी वरुन सेना भाजपात रस्सी खेच असताना युती झाल्यावर ही जागा भाजपालाच सुटणार आहे. यामुळे भाजपातील अनेकजण पक्ष श्रेष्ठींकडे तगादा लावत आहेत. मात्र, विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर गणेश नाईक भाजपात येतील आणि या मतदार संघातून निवडणूक लढवतील, अशी जोरदार चर्चा आहे. तर संघाचे जुने कार्यकर्ते आणि ठाणे भाजप शहर अध्यक्ष संदीप लेले यांच्या सह अनेक भाजप पदाधिकारी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावत आहेत.
हेही वाचा - शिर्डी विधानसभा आढावा: विखेंना शह देण्यासाठी सत्यजित तांबे सज्ज?
ठाणे शहर विधानसभा मतदार संघ
शिवसेनेचे इच्छुक
- रवि फाटक, आमदार, विधान परिषद
- नरेश म्हस्के शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख
- मिनाक्षी शिंदे, महापौर ठाणे मनपा
- अनंत तरे माजी आमदार शिवसेना उपनेते
- संजय भोईर
भाजपचे इच्छुक
- गणेश नाईक, माजी मंत्री
- संदीप लेले ठाणे, जिल्हाध्यक्ष
युती झाली किंवा नाही झाली तरी ठाणे शहर जागेवरून सेना भाजपात चांगलेच युद्ध होणार आहे. ज्याचे पडसाद ठाण्यातील ओवळा माजीवडा आणि वागळे इस्टेट विधानसभा मतदार संघावर उमटणार आहेत. मुळात ठाण्यात शिवसेने शिवाय इतर पक्षाचा आमदार असणे हे ठाण्यातील शिवसैनिकांपासून ते मातोश्री पर्यंत कोणालाच रुचलेले नाही. त्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदार संघावरुन नक्की घमासान होणार.