ठाणे - जिल्ह्यातील 143 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीत अंदाजे 80 टक्के मतदान झाल्याचे जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात मतदानादरम्यान 2 ते 3 मतदान केंद्रांवर झालेले किरकोळ मरहाणीचे प्रकार सोडता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर शातंतेत मतदान पार पडले. तर कल्याण ग्रामीणमधील 14 गावांनी मतदानावर बहिष्कार घातल्याचे समोर आले आहे.
सकाळी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याने, दुपारी 3.30 वाजेपर्यंत 71.28 टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता. जिल्ह्यात एकूण 143 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी पुरुष मतदार 1 लाख 31 हजार 916, स्त्री मतदार 1 लाख 18 हजार 250 व इतर - 2 असे मिळून एकूण 2 लाख 50 हजार 168 मतदार आहेत. दुपारी 3.30 वाजेपर्यंत एकूण 1 लाख 78 हजार 613 मतदारांनी मतदान केले होते. ही टक्केवारी 71.28 एवढी आहे. मतदान केलेल्या मतदारांमध्ये 85 हजार 627 स्त्री मतदार व 92 हजार 986 पुरुष मतदाराचा समावेश आहे. दरम्यान मतदानाची अंतिम आकडेवारी उशिरा प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.
खोणी ग्रामपंचायत निवडणुकीला छावणीचे स्वरूप
खोणी ग्रामपंचायतीसाठी 4 प्रभागांत मिळून एकूण 24 उमेदवार रिंगणात उतरले होते. निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत होणार असल्याने, कल्याण तालुक्यातील साऱ्यांचे लक्ष लागले होते. कल्याण तालुक्यात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणीकडे पहिले जाते. शुक्रवारी तेथील चारही मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदारांनी लाबंच-लांब रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. मतदानासाठी जेष्ठांना वाहनांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. मतदान करण्यासाठी अपंग व्यक्तींना उचलून मतदान केंद्रात नेले जात होते. दोन्ही पॅनलमधील नेते मंडळी परस्परांवर लक्ष ठेवून काही गडबड-गोंधळ होत नाहीना याची देखरेख करत होते. मात्र काही काळ गोधंळ उडाल्याने पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली होती. गावाच्या चौका चौकात पोलीस तैनात करण्यात आले होते. पूर्वीपासून वादग्रस्त ठरलेल्या खोणी ग्रामपंचात निवडणुकीसाठी डोंबिवली विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी निवडणूक केंद्रात प्रत्यक्ष हजेरी लावल्याने खोणी ग्रामपंचायत निवडणूक दिवसभर चर्चेचा विषय ठरली. तर भिवंडीच्या सोनाळे ग्रामपंचायत हद्दीत किरकोळ हाणामारीची घटना घडल्याचे समोर आले आहे.
गावांचा निवडणुकीवर बहिष्कार
नवी मुंबई महापालिकेतून वगळलेल्या १४ गावांच्या पाच ग्रामपंचायतींसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. या ग्रामपंचायतींच्या ५१ सदस्यांसाठी ही निवडणूक होणार होती. या गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्यामुळे आता या पाच ग्रामपंचायतींमध्ये प्रक्रिया पार पडणार नाही. याशिवाय जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवडणुका पार पडल्या आहेत.