ठाणे : ठाकरे गटाचे नेते नरेश मणेरा यांच्यावर काल (10 फेब्रुवारी) विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्यांनी तत्काळ जामीनासाठी अर्ज केल्यानंतर न्यायालयाने त्यांची बिनशर्त जामिनावर सुटका केल्याची माहिती नरेश मणेरा यांनी दिली आहे. तर सदरचा गुन्हा दाखल करण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
राजकीय षडयंत्रांचा आरोप : खासदार राजन विचारे यांनी हे राजकीय षडयंत्र असून ठाण्यात हा ९ वा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याची राजकीय खेळी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. तर आमदार आव्हाड म्हणाले की, लोक पाचवर्ष तुमची परीक्षा घेतात. सत्तेची मुजोरी नेहमीच राहत नाही. अन् पोलिसांनी मात्र मर्यादा सोडून वागू नका, अन्यथा एकदिवस जनतेत उद्रेक होईल आणि वेगळीच परिस्थिती निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. तर नरेश मणेरा यांनी न्यायालयाचे आभार मानले आणि न्यायालयाने न्याय केल्याचे सांगत सदरचा खोटा गुन्हा आहे. मी घटनास्थळी उपस्थित नसतानाही माझे नाव गोवण्यात आल्याने हा कुटील डाव असल्याचे सांगितले.
काय आहे प्रकरण : पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, ठाकरे गटाकडून एका मराठी गृहिणीवर जीवघेणा हल्ला करून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी रात्री घोडबंदर भागात घडली होती. गुरुवारी रात्री घरातील कार्यक्रमाच्या लाऊडस्पीकरच्या आवाजाने तिला त्रास झाला होता. त्यामुळे कार्यक्रमाची थांबवण्यासाठी ती नरेश मणेरा यांना भेटायला गेली. त्यानंतर तेथे उपस्थित महिलांनी तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जमावात उपस्थित असलेल्या 10 ते 12 महिला व पुरुषांनी नरेश मणेरा याच्यासह त्या महिलेचा विनयभंग केला. या घटनेदरम्यान तिच्या गळ्यातील सोनसाखळीही चोरीला गेल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर मणेरा यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.
महिलेने विनयभंग झाल्याची दिली तक्रार : नरेश मणेरा यांनी ठाण्याचे उपमहापौर पदही भूषवले आहे. ठाण्यातील घोडबंदर भागात राहणाऱ्या पीडित महिलेने कासारवडवली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ठाकरे गटाचे ओवळा-माजीवडा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात जोरदार हुल्लडबाजी सुरू होती. या कार्यक्रमाला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे देखील आले होते. मराठी माणसांच्या न्याय हक्काच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खराचेहरा समोर आल्याची टीका केली जात आहे.