ठाणे - ग्रामीण जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा नदीच्या लगत झाडी झुडपातील बेकायदा गावठी दारूच्या 10 हातभट्या पडघा व शहापूरच्या 3 पथकाने धाड टाकून उध्वस्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहापूर तालुक्यातील सरलांबा गावाच्या हद्दीतील भातसा नदी व कॅनल लगतच्या झाडी झुडपात करण्यात आली आहे.
टाळेबंदीच्या काळात सुरू होत्या गावठी दारूच्या हातभट्या
ठाणे जिल्ह्यातील विशेषतः शहापूर तालुक्यात दारू माफियांनी टाळेबंदीच्या काळात दारू विक्रीला बंदी असल्याने मोठ्या प्रमाणात नदी व कॅनल लगत गावठी दारूच्या हातभट्ट्या यापूर्वी पोलिसांनी उध्वस्त केल्या होत्या. मात्र, आता अनलॉक काळात पुन्हा झपटपट पैसे कमविण्यासाठी दारू माफियांनी तालुक्यातील सरलांबा गावाच्या हद्दीत नदी व कॅनल लगतच्या झाडी झुडपातील बेकायदा हातभट्या टाकून येथे शेकडो लिटर गावठी दारू तयार केली जात होती. याची खबर स्थानिक पोलिसांना मिळताच त्यांनी शहापूर उपविभागीय पथकातील 20 कर्मचारी आणि 5 महिला कर्मचारी तसेच आसीपी पडघा विभागातील 30 असे 50 ते 55 कर्मचाऱ्याचे 3 पथके गठीत करून या 10 गावठी दारूच्या हातभट्या उध्वस्त केल्या.
3 हजार 830 लिटर वाँश आणि दारू बनविण्याचे साहित्य केले नष्ट
पोलिसांनी धाडी दरम्यान घटनास्थळी असलेल्या 10 हातभट्टीवर दारू तयार करण्यासाठी लागणारे 3 हजार 830 लिटर कच्चामाल (वाँश) व दारू तयार करताना लागणारे साहित्य, असे एकूण 1 लाख 16 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम आढाव यांनी दिली. तर फरार झालेल्या दारू माफियांवर शहापूर पोलीस ठाण्यात दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मुलाच्या किरकोळ चुकीमुळे वडिलांची नदीत उडी घेऊन आत्महत्या