नवी मुंबई - महानगरपालिकेच्या शाळेतील संगणक शिकवणाऱ्या शिक्षकाला शाळेतील 14 पेक्षा अधिक विद्यार्थीनींचा विनयभंग केल्याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. लोचन परुळेकर (वय 30) असे त्या शिक्षकाचे नाव असून त्याला डोंबिवली येथील घरातून अटक करण्यात आली आहे.
लोचन परुळेकर हा शिक्षक नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत विद्यार्थ्यांना संगणक शिकवण्याचे काम करत होता. मात्र, अनेकवेळा संगणक शिकवताना तो शाळेतील सहावी ते आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे करत होता. हा शिक्षक महापालिका शाळेतील शिक्षक नसून वात्सल्य नावाच्या ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 'सीएसआर' फंडातून त्याची नियुक्ती करण्यात आली होती. संगणक शिकवण्याच्या बहाण्याने तो मुलींच्या शरीराशी नको ते चाळे करून विनयभंग करत होता. मात्र, शाळेतील विद्यार्थिनींनी घाबरून या प्रकाराची वाच्यता कुठेही केली नव्हती, यामुळे त्याची हिंमत दिवसागणिक वाढत होती.
दरम्यान, 12 फेब्रुवारीला संपूर्ण शाळेची सहल गेली होती, त्यादिवशी परुळेकर याने मुलींना आणखी चांगल्या प्रकारे संगणक शिकवता येईल, असे सांगून शाळेत बोलावले होते. तसेच अनेकवेळा सुट्टीच्या दिवशी किंवा शाळेच्या नियोजितवेळे व्यतिरिक्त शाळा बंद असताना हा शिक्षक मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग करत होता. ही बाब शाळेतील शिपायाने मुख्याध्यापकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सहावी ते आठवीच्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षिकांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता, त्यातील काही मुली रडू लागल्या व घडलेला प्रकार त्यांनी सांगितला. त्यानुसार 14 मुलींचा या शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला.
त्यानुसार या घटनेची माहिती शाळा प्रशासनाच्या माध्यमातून वात्सल्य ट्रस्टला कळवण्यात आली. ट्रस्टने परुळेकर याला कामावरून काढून टाकले आहे. या शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करून ज्या ज्या मुलींचा त्याने विनयभंग केला आहे त्यांची नावे एफआयआरमध्ये टाकण्यात आली आहेत. लोचन परुळेकर या शिक्षकाला त्याच्या डोंबिवली येथील घरातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित शिक्षकाची आईसुद्धा महानगरपालिका शाळेत शिक्षिका असल्याची माहिती मिळाली आहे.
हेही वाचा -
'दिनांक, पर्यवेक्षक, नगरपालिका हे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठीला दिले'