नवी मुंबई - नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून 18 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी टाटा उद्योग समूह पुढे आला असून त्यांच्या माध्यमातून 1 कोटी 77 लाख रुपयांची वैद्यकीय साधने महापालिकेला पुरविण्यात आली आहेत.
नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढली असून 18 हजरांपेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण नवी मुंबई महापालिका हद्दीत सापडले आहेत. शनिवारी (दि. 8 ऑगस्ट) नवी मुंबईत 455 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नवी मुंबईत वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता टाटा उद्योग समूह पालिकेच्या मदतीला धावून आले असून, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या माध्यमातून 1 कोटी 77 लाख रकमेची वैद्यकीय सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. यामध्ये 10 हजार 500 नग एन 95 मास्क, 10 हजार सर्जिकल मास्क, 10 हजार 80 पीपीई किटस, 2 हजार मेडिकल गॉगल्स, 2 हजार हॅण्डग्लोव्हज्, 7 हजार शू-कव्हर, अशी विविध सुरक्षा साधने देण्यात आली आहेत. या साधनांचा कोरोना योद्ध्यांना मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार आहे, असे नवी मुंबई आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले.