ठाणे - मध्य रेल्वेत कंत्राटी उद्धोघोषक असलेल्या एका कर्मचाऱ्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या कर्मचाऱ्याने आपला विष पितानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. व्यंकटेश बाबू वेमुगुंटी, असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या त्याच्यावर मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
६ महिन्यापासून वेतन नसल्याने उपासमार -
पीडित कर्मचारी व्यंकटेश हा कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात इंदिरा नगर परिसरात आपल्या कुटुंबासह राहतो. तो मध्ये रेल्वेतील एका रेल्वेच्या ठेकेदाराकडे कंत्राटी पद्धतीने उद्धघोषकाचे काम करतो. मात्र, संबधित ठेकेदाराने त्याच्यासह इतर कामगारांचे सहा महिन्यांपासून वेतन दिलेले नाही. त्यामुळे त्यांची उपासमार सुरू आहे. याबाबत व्यंकटेशने मध्य रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. घरची परिस्थिती खूपच खालावल्याने त्याने काल सायंकाळी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याने व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे या घटनेची माहिती समोर आली. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
घटनेची नोंद करण्यासाठी प्रकरण संबधित पोलीस ठाण्यात वर्ग -
या घटनेची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र, ही घटना कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सदरच्या घटनेची नोंद संबधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.