नवी मुंबई - शहरात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण वाढत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तसेच अनेक त्रासांना सामोरे जावे वाहत आहे. स्वच्छ शहरात देशात तिसरे व राहण्यायोग्य देशात दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नावाजलेल्या नवी मुंबई शहराला सध्या वायू प्रदुषणाने विळखा घातला आहे.
आधीच कोरोनाने नागरिक बेजार झाले असताना आता एमआयडीसीतील कारखान्यांमधून रात्री अपरात्री वायु प्रदूषण केले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोमवारी रात्री कोपरी गाव, सेक्टर 26, पावणे गाव परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण झाले होते. त्यामुळे नागरिकांना मळमळ, त्वचेला खाज येणे असे त्रास होऊ लागले होते. अशा घटना या परिसरात वारंवार होत आहेत. त्यामुळे भविष्यात नवी मुंबईत भोपाळसारखी वायू दुर्घटना होऊन हजारो नागरिकांचे प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे दुर्गंधीयुक्त वायू सोडणाऱ्या कंपन्यांवर प्रशासनाने वेळीच कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.