ठाणे - अंबरनाथ येथे शिकवणी वर्गात पाच वर्षांच्या विद्यार्थ्यांचे स्पेलिंग चुकल्यामुळे एका शिक्षकाने स्टीलच्या पट्टीने अमानुष मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. याप्रकरणी अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलिसांनी शिकवणी घेणार्या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वच्या राहुल इस्टेट परिसरात युरेकिड्स नावाचा क्लास आहे. या क्लासमध्ये ग्रीन सिटी भागात राहणारा ५ वर्षीय विद्यार्थी शिकवणी साठी जात होता. काल नेहमीप्रमाणे तो विद्यार्थी क्लासला गेला असता येथील शिकवणी घेणारे शिक्षक नितेश प्रधान यांनी त्या विद्यार्थ्याला स्पेलिंग विचारले होते. मात्र, पीडित विद्यार्थ्याचे स्पेलिंग चुकल्याने शिक्षक नितेश यांनी विद्यार्थ्याला स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे पीडित विद्यार्थ्याच्या अंगावर निशाण उमटले आहेत.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्याला अंगोळ घालत असताना त्याच्या आईला मुलाच्या अंगावर हिरवे, निळे झालेले वळ दिसले. आईने मुलाकडे विचारणा केली त्याने नितेश प्रधान या शिक्षकाने मारल्याचे सांगितले. त्यानंतर मुलाच्या आईने थेट पोलिसात धाव घेऊन शिक्षक प्रधान यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार प्रधान यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेनंतर अंबरनाथ शहरातील पालकवर्गात संतापाचे वातावरण पसरले आहे.