ठाणे : भिवंडी शहर व ग्रामीण परिसरात रविवारी सायंकाळपासून हवामानात बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. त्यातच रात्रीपासून तर मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे भिवंडीत मुख्य रस्ता असलेल्या कल्याण नाका ते वांजरपट्टी नाका परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊन वाहतूक कोंडी झाली. यामुळे वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करीत वाहतूक कोंडी फोडताना पाहवयास मिळाले. तसेच शहरातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला.
नाले सफाईची पोलखोल : विशेष म्हणजे भिवंडी महापालिका प्रशासनाने २ कोटी ९ लाख रुपये खर्च करून यंदा नालेसफाई करण्यात आली आहे. मात्र नालेसफाईच्या सुरवातीपासून नालेसफाई न करता ठेकेदाराने गाळ तसाच ठेवून वरवर सफाई केल्याच्या अनेक तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या, त्यामुळे ज्या भागात पाणी साचेल तेथील ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून अशा ठेकेदारांचे बिल अदा करणार नाही, असा इशारा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी अगोदरच दिला होता. मात्र पहिल्याच मुसळधार पावसाने नाले सफाईची पोलखोल होऊन त्याचा नाहक त्रास नागरिकांना भोगावा लागत आहे.
वाहतूक व्यवस्था कोलमडली : भिवंडी शहरातील निजामपुरा, कनेरी, कमला होटेल , नारपोली, पद्मा नगर, तीन बत्ती, शिवाजी नगर, भाजी मार्केट, नजराना कंपाऊंड येथील सखल भागात शिरल्याने व्यापारी व रहिवाशांचे हाल झाले आहे. दरम्यान, पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे कल्याण रोड, अंजूर फाटा, वंजारपट्टी नाका, नारपोली अशा विविध मार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पावसाचा कहर पाहता शहरात काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनासह एका घराची भिंतीही कोसळून त्या घरात राहणाऱ्यांचा संसार उघड्यावर आला.
एसटी डेपोला तलावाचे स्वरूप : दरम्यान, भिवंडी एसटी डेपोला तर मुसळधार पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे एसटी डेपोमध्ये जाऊन लालपरीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दैना उडाली आहे. तर सोशल मीडियावर या एसटी डेपोचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन त्या व्हिडिओसोबत अपयशी शिंदे फडवणीस सरकार असे कमेंटही नेटकऱ्यांनी व्हायरल केले आहे.
तर एका शाळेच्या आवारासह वर्गाच्या दारात पावसाचे पाणी साचल्याने खबदरदारीचा उपाय म्हणून शाळा प्रशासनाने विद्यार्थांना शाळेतुन घरी सोडण्यात आले.
हेही वाचा :
- Monsoon Update : राज्यात अखेर मान्सून सक्रिय; पुढील पाच दिवस 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा
- mumbai rain : मान्सूनच्या पावसाची सुरुवात होताच थिरकले मुंबईकर, कुठे खेळला गरबा तर कुठे तुंबईमुळे नागरिकांची तारांबळ
- Shehbaz Sharif Video : पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मुसळधार पावसात महिला अधिकाऱ्याची छत्री हिसकावली, व्हिडिओ व्हायरल