ठाणे - मुरबाड एस टी आगाराच्या आवारात बस पकडण्यासाठी जात असताना बसच्या चाकाखाली येऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. सुदाम भालेराव (अंदाजे वय ५५) असे प्रवाशाचे नाव आहे.
हेही वाचा - केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ईटीएफ लाँच करण्याला मंजुरी
सुदाम हे मुरबाड तालुक्यातील विढे गावचे रहिवासी असून सध्या उल्हासनगर येथे नोकरी निमित्त राहत होते. सुदाम भालेराव हे मुरबाड बस आगारात बस पकडण्यासाठी जात असताना त्याच सुमाराला शहापूर वरून मुरबाड आगारात प्रवेश करणारी (एमएच २० बीएल ०९८६) एसटी बस भरधाव वेगाने भालेराव यांच्या अंगावरून गेली. यावेळी बसच्या चाकाखाली चिरडून सुदाम भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला. सुदाम मुंबई महानगरपालिकेत नोकरी करत होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत मृतदेह मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात उत्तरणीय तपासणीसाठी पाठवला आहे. अपघाताची नोंद मुरबाड पोलीस ठाण्यात करण्यात आली. अधिक तपास मुरबाड पोलीस करीत आहेत.