नवी मुंबई - शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग आढळून आला. यात बऱ्याच कामगार आणि व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केट हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. मार्केट परिसरातील कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात एपीएमसी प्रशासन सपशेल फेल ठरले आहे. त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई मनपाने भरारी पथके नेमली आहेत.
दरम्यान, एपीएमसी मार्केटमधील कोरोना नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कंबर कसली आहे. आता मार्केटमध्ये लक्ष ठेवण्यासाठी मनपा आयुक्तांनी भरारी पथके नेमली आहेत. ही भरारी पथके पाचही मार्केटमध्ये फिरणार आहेत. मास्क न वापरणे, सामाजिक अंतर न ठेवणे असे नियम तोडण्याऱ्यांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच वेळ पडली तर दुकानेदेखील सील करण्यात येतील, असा इशारा नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिला आहे.