ठाणे - आगरी सेनेचे प्रमुख राजाराम साळवी यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांना आगरी सेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र, प्रमुखाचा हा निर्णय फेटाळत संघटनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील हे आगरी समाजाचे आहेत. त्यांना पाठिंबा द्यायचे सोडून आगरी सेनेच्या प्रमुखांनी शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे नाराज झालेल्या अंबरनाथ तालुक्यातील आगरी सेनेचे तालुका अध्यक्ष निलेश रसाळ यांच्यासह कार्याध्यक्ष, युवक अध्यक्ष, तालुका विभाग प्रमुख यासारख्या अनेक महत्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.
आगरी सेनेत पडलेली फूट श्रीकांत शिंदे यांना मोठा धक्का मानला जातो आहे. दरम्यान, कल्याण महापालिकेतील २७ गाव तसेच, अंबरनाथ तालुक्यात आगरी समाज बहुसंख्येने आहे. त्यामुळे आगरी सेनेच्या भूमिकेकडे विशेष लक्ष असते.