ठाणे - कल्याणमधील एका प्रतिष्ठित गृहनिर्माण सोसायटीने फिजिकल डिस्टिंसिंगचे भान राखले. यामुळे सोसायटी कोरोनामुक्त झाली आहे. या सोसायटीमधील एक रहिवासी डॉक्टर म्हणून मोठ्या रुग्णालयात कार्यरत आहेत. कठीण परिस्थितीत रुग्णांची सेवा शुश्रूषा करत होते. या डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे ही सोसायटी कोरोनामुक्त झाली आहे. कोरोनासदृश परिस्थिती सुरू झाल्यापासून या डॉक्टरांनी रुग्णालयातुन घरी परत आल्यानंतर गेटपासून ते घरात जाईपर्यंत प्रत्येक गोष्टी ते स्वतः सॅनीटाईज करत होते. तसेच घरात देखील ते फिजिकल डिस्टन्स ठेवत होते.
संबंधित डॉक्टरांनी ते कार्यरत असलेल्या रुग्णालयात इतर रुग्णांवर उपचार करत असताना स्वतःला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच त्यांनी सूज्ञपणा दाखवला. त्यानंतर पुढे येऊन महापालिकेच्या रुग्णालयाशी संपर्क साधून स्वतः न्यूयॉन रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू केले. स्वतःचा मुलगा आणि पत्नीला देखील टाटा आमंत्रा येथे विलगीकरण कक्षात दाखल होण्यास सांगितले. विशेष म्हणजे डॉक्टरांनी दाखवलेल्या सूज्ञपणामुळे सदर गृहनिर्माण सोसायटीच्या प्रत्येक सदस्यांनी देखील स्वतः ला घरातच अलगीकरण करून घेतले. गेल्या 15 दिवसात या सोसायटीच्या सदस्यांनी आपआपसात सलोखा निर्माण करून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आत येण्यास आणि आतील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्यास प्रतिबंध केला. त्यामुळे या रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध झाला.
हेही वाचा - आताही जर राजकारणच कराल तर... - उद्धव ठाकरे
प्रसंगावधनामुळे सोसायटीमध्ये नव्याने एकही बाधित रुग्ण आढळून आला नाही. कोरोना बाधित झालेले डॉक्टर आता करोनामधून बरे झाले आणि ते घरी आले आहेत. तसेच डॉक्टरांचे कुटुंबाचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आल्याने संपूर्ण सोसायटीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर गृहनिर्माण संस्थेने आपआपसात राखलेला सलोखा, डॉक्टरांचे कुटुंबाची घेतलेली विशेष काळजी तसेच डॉक्टरांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा यामुळे मोठा अनर्थ टळला.
ही बाब महापालिका आयुक डॉ. विजय सूर्यवंशी यांना समजताच त्यांनी करोनाबाधित डॉक्टरांचे आणि सदर गृहनिर्माण संस्थेचे कौतुक केले. या डॉक्टरांचा तसेच संस्थेचा आदर्श इतर गृहनिर्माण संस्थनी घेऊन कोरोनाच्या प्रसारास प्रतिबंध घालावा, असे देखील आयुक्तांनी आवाहन केले. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 5 कोरोनाबाधित रूग्ण उपचाराअंती डोंबिवलीतील निऑन हॉस्पीटलमधून डिस्चार्ज झाले आहेत. त्यामुळे आता डिस्चार्ज झालेल्या रूग्णांची संख्या 45 झालेली आहे. तसेच रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 81 इतकी आहे. या डिस्चार्ज झालेल्या रूग्णांमध्ये आयकॉन हॉस्पीटलमधील 3 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर 1 डायलेसीस रूग्ण व एका वयोवृध्द महिलेचा समावेश आहे.