ठाणे - अंत्यविधीच्या कार्यक्रमावर कंजारभाट समाजाने बहिष्कार टाकल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अंबरनाथ शहरात राहणाऱ्या विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता. त्यामुळे कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास समाजातील लोकांना मज्जाव केला होता.
अंबरनाथमध्ये राहणारे विवेक तमायचीकर यांच्या आजीचे काल रात्री १० वाजता निधन झाले. या दुःखाच्या कार्यक्रमात कंजारभाट समाजातील लोकांनी सहभागी होणे अपेक्षित होते. मात्र, तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेला समाजातील एकही व्यक्ती सहभागी झाला नाही. मात्र, यामागचे कारण अत्यंत धक्कादायक आहे. विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला होता. त्यामुळे कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने दीड वर्षांपासून त्यांना बहिष्कृत केले आहे. जात पंचायतीने तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास समाजातील लोकांना मज्जाव केला.
खळबळजनक बाब म्हणजे ज्यावेळी तमायचीकर यांच्या आजीचे निधन झाले त्यावेळी याच समाजातील एका लग्नाचा हळदी समारंभ सूरू होता. या समारंभात डीजेसुद्धा वाजत होता. मात्र, डीजे बंद न करता उलट, कोणीही तमायचीकर यांच्या आजीच्या अंत्यात्रेत सहभागी व्हायचे नाही, असे एकाने भाषण देत सांगितले.
यासंदर्भात विवेक तमायचीकर म्हणाले, आपण समाजाच्या अनिष्ठ परंपरेला विरोध करत आहोत म्हणून समाजाने माझ्यावर हा बहिष्कार टाकला आहे. आपण आता पोलिसात तक्रार करणार आहोत. तसेच शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. एकंदरीतच ऐकीकडे पुरोगामी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना, अशा घटनांमुळे अजूनही समाजाची मानसिकता बदलण्यास तयार नसल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे.