ठाणे - एका मिठाईच्या कारखान्यात कारागीर मिठाई तयार करत असताना भलामोठा साप त्याच्या शेजारी येवून गोणीखाली बसल्याची घटना घडली. अचानक एका व्यक्तीचे सापाकडे लक्ष गेल्याने त्याने कारखान्याबाहेर पळ काढला. तर साप घुसल्याचे ऐकून इतर कारागीर कारखान्यात जाण्याची हिम्मत करत नव्हते. ही घटना कल्याण पश्चीमेकडील गांधारी गावात असलेल्या अग्रवाल कॉलेजच्या मागे एका मिठाईच्या कारखान्यात घडली.
लग्नसराई आणि त्यातच रमजानचा महिना सुरू असल्याने या दिवसात मिठाईला खूप मागणी असते. त्यामुळे मिठाईच्या कारखान्यात रात्री उशिरापर्यंत विविध प्रकारची मिठाई बनविण्याचे काम कारागीर करत असतात. या मिठाईच्या कारखान्यातही ६ ते ७ कारागीर काम करत होते. नेहमीप्रमाणे दुपारच्या सुमाराला काही कारागीर मिठाई तयार करण्याच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी एका कारागिरीच्या शेजारी असलेल्या गोणीखाली साप दडून बसल्याचे त्याला दिसले. त्यानंतर त्याने कारखान्याबाहेर येवून इतर कारागिरांना साप घुसल्याची माहिती दिली. त्यापैकी एका कारागिराने त्या सापाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, साप बाहेर न पडता किचन ओट्यावरून वॉश बेसिनमध्ये जाऊन लपून बसला.
तेव्हा गणेश खंडागळे नावाच्या व्यक्तीने सर्पमित्र हितेशला कारखान्यात साप शिरल्याची माहिती दिली, आणि किचनचा दरवाजा बंद केला. त्यानंतर सर्पमित्र येईपर्यंत या सापाने किचनमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खिडकी दरवाजा बंद असल्याने अखेर तो किचनच्या वॉशबेसिनमध्ये लपून बसला होता. सर्पमित्र हितेशने किचनचा दरवाजा उघडून या भल्यामोठ्या सापाला पकडले. साप पकडल्याने कारागिरांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप ७ फुटाचा असून धामण जातीचा असल्याची माहिती सर्पमित्र हितेशने दिली. तर काही वेळातच सापाला निसर्गरम्य जंगलात सोडण्यात आले.