ठाणे - महावितरणच्या कल्याण परिमंडळातील सहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून या कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील १२ कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्राहकांनी महावितरण कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वीज मीटरचे रीडिंग सुरू झाल्यानंतर ग्राहकांना लॉकडाऊनचे व त्यानंतरचे असे एकूण तीन महिन्याचे बिल वीज वापरानुसार देण्यात येत आहे. वीजबिल प्राप्त झाल्यानंतर बिल अधिक असल्याच्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यातच आता कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे. ग्राहकांनी स्वतःला आणि महावितरण कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यालयातील गर्दी टाळावी, असे आवाहन मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी www.mahadiscom.com या संकेतस्थळावर किंवा वीजवितरणच्या मोबाईल अॅपवर ग्राहकांनी तक्रारी नोंदवाव्यात. या दोन्ही पर्यायांसह विविध पेमेंट वॅलेटचा वापर बिल भरण्यासाठी करावा. वीज कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यास मनुष्यबळाच्या उपस्थितीवर आणि पर्यायाने वीज सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्राहकांनी कार्यालयात गर्दी करू नये, असे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले.
दरम्यान, कल्याण परिमंडलात सर्वच विजवितरण कार्यालये व वीजबिल भरणा केंद्रांमध्ये तापमापक यंत्र, सॅनिटायझर, मास्क, हॅन्ड ग्लोव्हज् आणि सोशल डिस्टन्सचे पालन करून कामकाज सुरू आहे. काही ठिकाणी ग्राहकांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सचे पालन करण्यावर मर्यादा येत आहेत. कोरोनाची बाधा झालेले कर्मचारी आढळलेल्या ठिकाणांसह सर्वच कार्यालयांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.