ठाणे - उल्हासनगर महापालिकेच्या अजब कारभाराचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. शहरातील रिंगरूट रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित होणाऱ्या शाळेसाठी महापालिकेने तब्बल ६ कोटी रुपये मंजूर केल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे या कामाला तत्कालीन आयुक्तांनी स्थगिती दिल्याचेही समोर आले आहे. याआधीही ही महापालिका अनेकदा वादग्रस्त कारभारामुळे चर्चेत आली आहे.
या निधीला गेल्याच आठवड्यात उल्हासनगर महापालिकेचा ८०० कोटींच्यावर अर्थसंकल्प महासभेत सादर करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये उल्हासनगर शहरातील शाळा क्रमांक १८ आणि २४ च्या पुनर्बांधणीसाठी आधीच्या ४ कोटीमध्ये २ कोटींची भर घालून एकूण सहा कोटींचा निधी अर्थसंकल्पत मंजूर करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे या शाळेच्या जागेची मालकी हक्क मिळवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असताना त्या आधीच सत्ताधाऱ्यांकडून घाईघाईत हा निधी का मंजूर केला आहे, याबाबद्दल शंका उपस्थित केली जातीय. विशेष म्हणजे शाळांच्या पुनर्बांधणीसाठी नगररचना विभागाचा अभिप्राय आणि तांत्रिक मंजुरी नसताना ही चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
या प्रकरणी तत्कालीन उपायुक्तांना हा प्रस्ताव रद्द केला होता. मात्र आता नव्या आयुक्तानी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी या निधी मंजुरी दिल्याचा आरोप मनसेने केला आहे. शिवाय या शाळेचा मोठा भाग १२० फुटांच्या रिंगरुट रस्त्याच्या रुंदीकरणात बाधा आणत आहे. असे असताना या शाळेसाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केला जात असल्याने सत्ताधाऱ्यांवर टीका होत आहे. दरम्यान, या शाळेसाठी घाईघाईत केलेल्या कामासाठी दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.