वसई: दिल्लीत क्रूर हत्या झालेल्या श्रद्धा वालकर (Shraddha Murder Case ) हिच्या हत्याकांड प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यात आता आफताबने श्रद्धाचा मोबाईल फोन भाईंदरच्या खाडीत फेकल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दिल्ली पोलिसांकडून आता भाईंदरच्या खाडीत शोध कार्य (Delhi Police Search Operation in Bayander Bay) सुरू आहे. दोन बोटीच्या सहाय्याने खोल समुद्रात ही शोधमोहीम सुरु ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल जर आफताबने समुद्रात फेकला असेल तर त्याचा शोध घेणं पोलिसांना मोठं आव्हान असणार आहे.
काय आहे प्रकरण? 2019 पासून आफताब आणि श्रद्धा हे एकमेकांना ओळखत होते आणि एकत्र मालाड येथील कॉल सेंटरमध्ये नोकरी करत होते. दोघांचे आई-वडील वेगवेगळे राहत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. कॉल सेंटरमध्ये एकत्र काम करणाऱ्या या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्यानंतर या दोघांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा स्वतंत्र व्यक्तिगत निर्णय घेतला.आणि हाच निर्णय श्रद्धासाठी धोक्याचा ठरला.
दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध: वयाच्या 25 व्या वर्षी श्रद्धाने हा निर्णय आई-वडिलांना न जुमानता घेतला आणि घराबाहेर पडली. श्रद्धा आणि आफताब हे दोघे वसईतील एवरशाईन नगर येथे राहू लागले. त्यानंतर दोघांचे खटके उडू लागले. 2020 मध्ये आफताबने श्रद्धाला मारहाण देखील केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान, 2022 पर्यंत आफताब आणि श्रद्धा हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.
एका डेटिंग ॲपवरून दोघांची ओळख झाली अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, दिल्लीत राहत असताना श्रध्दाच्या मनाविरुध्द आफताबचे दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले, आणि यातुन निर्माण झालेल्या वादातुनचं श्रध्दाची हत्या झाली. हत्येने मोठी खळबळ माजली.