मीरा भाईंदर(ठाणे) - व्यापाऱ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर अखेर मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांनी परिपत्रक काढून शहरातील दुकाने 17 ऑगस्टपासून नियमित सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळेच शहरातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळला आहे.
टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. मागील पाच महिन्यांपासून बंद असलेल्या व्यापारी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे, तर काही दुकानदार भाडेतत्त्वावर असल्यामुळे चार ते पाच महिन्यांचे भाडे थकले आहेत. मिशन बिगिन अगेननंतर सम व विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्यात आली. मात्र, या निर्णयाला दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
राजकीय पक्षांनीदेखील शहरातील दुकाने नियमितपणे उघडण्यासाठी जोरदार मागणी केली होती, तर व्यापारी संघटनेच्या माध्यमातून मीरा भाईंदर महानगरपालिका मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आले होते. व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त महेश वरुडकर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यामध्ये सम-विषम पद्धत रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. अखेर महापालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी ही मागणी मान्य करत, परिपत्रक जारी केले.
परिपत्रकानुसार, सोमवारपासून (17 ऑगस्ट) शहरातील सर्व दुकाने सकाळी 9 ते 7 वाजेपर्यंत खुली राहतील. शहरातील मोठे मार्केट, स्विमिंग पूल, मॉल्सवर बंदी कायम आहे, तर प्रतिबंधक क्षेत्रातील दुकाने बंदच राहतील.