ठाणे - एका शासकीय ग्रामीण रुग्णालयाच्या नव्याने उभारल्या जाणाऱ्या इमारतीत (Rural Government Hospital Building In Thane) दुसऱ्या मजल्यावर काम करणाऱ्या महिलेवर साईट सुपरवायझरने बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न (Site Supervisor Attempted Rape) केला. याप्रकरणी शहापूर तालुक्यातील खर्डी पोलीस ठाण्यात सुपरवायझरवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रमणी प्रल्हाद मनवर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी सुपरवायझरचे नाव आहे.
जीवे ठार मारण्याची धमकी देत बलात्काराचा प्रयत्न
शहापूर तालुक्यात (Shahapur Tahsil) खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या (Khardi Rural Hospital) नवीन इमारतीचे काम सुरू आहे. काम सुरू असताना आरोपी सुपरवायझर चंद्रमणी याने कामावरील एका आदिवासी महिलेला कामाच्या बहाण्याने ५ डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावर बोलावले होते. सुपरवायझरने बोलविल्याने ही पीडित महिला दुसऱ्या मजल्यावर गेली. यावेळी दुसऱ्या मजल्यावर कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने पीडित महिलेशी अश्लील चाळे सुरु केले. पीडित महिलेने त्याला विरोध केला. पीडितेने विरोध केल्याचे पाहून आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करून इमारतीच्या बाहेर पळ काढला.
घटनेच्या दिवसापासून आरोपी फरार
या घटनेमुळे पीडित महिलेच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यामुळे महिलेने घडलेली घटना पतीला दुसऱ्या दिवशी सांगितली. पीडितेला घेऊन तिचा पती खर्डी पोलीस दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात (Shahapur Police Station) गेला असता, पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी चंद्रमणीवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण आरोपीला लागताच आरोपी पसार असल्याची माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली आहे. आरोपी हा नाशिक शहरात राहणारा असल्याने त्याच्या शोधात पोलीस पथक रवाना केले असल्याचेही सांगण्यात आले. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.