ठाणे - भिवंडीत कल्याण नाका ते साईबाबा नाका उड्डाणपुलास स्व. बाळासाहेब ठाकरे नामकरणाचा ठराव पालिकेच्या महासभेत मंजूर करून १७ नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी त्याचे लोकार्पण करण्याचे ठरले होते. मात्र, एक दिवस आधीच एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने हा पूल वाहतुकीस सुरू केला. यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने बाळासाहेंबाचा अवमान केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गोंधळ घालत या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले.
भिवंडी शहरातील कल्याण नाका ते साईबाबा नाका हा रस्ता सदैव वाहतूक कोंडीने व्यापलेला असताना याठिकाणी उड्डाणपूल बांधकामास सन २०१५ मध्ये सुरवात झाली. या पूलाचे काम अपूर्ण असतानाच एमएमआरडीए प्रशासनाने या पुलावरील विरुद्ध दिशेने अर्थात साईबाबा नाका येथून वाहनास प्रवेश देण्यास सुरवात केली. त्यामुळे ज्या ठिकाणी या वाहनांना उतरायचे आहे. त्या ठिकाणी विरुद्ध दिशेच्या मार्गिकेवरून खाली येऊन पुन्हा वळण घेऊन आपल्या मार्गिकेवर जावे लागत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा - ‘तक्रारी करतोस काय, बघून घेतो’; अश्विनी बिद्रेंच्या पतीला न्यायालय परिसरातच धमकी
दुसरीकडे भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून कल्याण नाका ते साईबाबा नाका उड्डाणपुलाचे काम हाती घेतले. मात्र, या उड्डाणपुलाचे काम अर्धवट असतानाच एमएमआरडीए प्रशासनाने घाईघाईत हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला केला असून त्यामुळे दांडेकर कंपनी या ठिकाणी नवी वाहतूक कोंडीची समस्या तयार झाली आहे.
हेही वाचा - नवी मुंबईत भाजीपाल्याची आवक वाढल्याने भाव घटले
विशेष म्हणजे उड्डाणपुलाचे काम अर्धवट असताना आणि उड्डाणपुलाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याचा प्रस्ताव असताना एमएमआरडीए प्रशासनाने स्व. बाळासाहेबांच्या नावाचे फलक न लावता घाई करीत उड्डाणपूल वाहतुकीस खुला केल्याने शिवसैनिकांनी गोंधळ घालून नारळ वाढवून, फित कापून या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.