ठाणे - आयुष्यभर शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या 64 वर्षीय कट्टर शिवसैनिक गंभीर आजाराने ग्रस्त असूनही आयुष्याच्या अशा वळणावर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा उशाजवळ ठेवून पूजा करत आहे. नंदकुमार सावंत, असे त्या कट्टर शिवसैनिकाचे नाव आहे. त्यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुबीयांनी राहते घर विकले, जवळचे सर्व पैसेही उपचारासाठी खर्च केल्याने सध्या सावंत कुटुंबीय हालाखीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कट्टर शिवसैनिकाच्या मुलीने शिवसेना नेत्यांनी उपचारसाठी एकत्र येऊन मदत करावी, अशी याचना करत असल्याची बातमी 'ईटीव्ही भारत'ने मागील आठवड्यात प्रसारित केली होती. त्यानंतर सावंत कुटुंबीयांसाठी शिवसेना नेत्यांकडून मदतीचा ओघ सुरूच झाला आहे. मंगळवारी (दि. 14 सप्टेंबर) ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी उपचारासाठी लागणारी मदत जाहीर केली आहे.
शिवसेना वैद्यकीय सेवा विभागानेही केली मदत जाहीर
'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर शिवसेना वैद्यकीय सेवा विभागातील डॉक्टरांचे पथक नंदकुमार सांवत यांच्या घरी जाऊन त्यांच्या उपचाराबाबत माहिती घेतली. त्यांना लागणारी औषधे दिली जाणार असल्याचेही शिवसेना वैद्यकीय सेवा विभागाकडून सांगण्यात आले. तर दादरच्या शिवसेना भवन मधूनही मदतीसाठी सांवत कुटूंबाशी संपर्क केल्याचे सांगण्यात आले.
दिवंगत बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा कायम
शिवसेना पक्षाच्या स्थापनेपासून दिवंगत बाळासाहेब ठाकरे नेहमीच बोलत असत की, शिवसेनेत 80 टक्के व समाजकरणं 20 टक्के राजकारण हाच ध्यास नंदकुमार यांनी मनात ठेवून शिवसेनेसोबत नाळ जोडली. त्यांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता केवळ बाळासाहेबांवर असलेली श्रद्धाच त्यांनी आतापर्यंत कायम ठेवली. नंदकुमार मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवासी असून ते मुंबईतील करीरोड परिसरातच लहानाचे मोठे झाले. तर गोदरेज कंपनीत कार्यरत होते. मात्र, कालातंराने मुंबई सोडून त्यांनी ठाण्यातील किसननगर भागात स्वतःचे घर घेऊन राहत होते. मात्र, उपचारासाठी त्यांना राहते घर विकावे लागले आहे. विशेष म्हणजे ऐन कोरोना काळात सांवत कुटूंब भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात असलेल्या एका इमारतीत राहण्यास आले. मात्र, उपचार आणि घर खर्च चालविणासाठी आर्थिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांची मुलगी श्रेया ही एका खासगी कंपनीत अहोरात्र काम करून त्याच पैशातून उपचारासाठी लागणार खर्च भागवत आहे. मात्र, शिवसेना नेत्यांनी सावंत कुटूंबाला मदतीचा हात दिल्याने सावंत कुटूंबाने 'ईटीव्ही भारत' व शिवसेना नेत्यांचे आभार मानले.
हेही वाचा - ठाण्यातील कोळी समाजात गौरीला दाखवतात मांसाहारी नैवेद्य; 150 वर्षांची परंपरा