ठाणे - जगभरात काल व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. प्रेमाचा दिवस म्हणून या दिवशी प्रेम व्यक्त केले जाते. खर तर समाजात आपल्या आजूबाजूला असे अनेक चेहरे आपण पाहतो जे प्रेमाचे भुकेले आहेत, ज्यांच्या नशिबी जीवन जगण्यासाठीचा संघर्ष आला आहे. अशांनाच ध्यानी ठेवून शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपसंपर्क प्रमुख संतोष शिंदे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वीटभट्टीवर जाऊन तेथील मजुरांच्या छोट्या मुलांसमवेत केक कापून प्रेमाचा दिवस साजरा केला.
हेही वाचा - दिव्यातील 'दबंग' पालिका अधिकाऱ्याची धमकीची क्लिप व्हायरल, पाठीशी कोण?
गोरगरीब बांधवांच्या डोळ्यात अश्रू
संतोष शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे व आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे गोरगरीब बांधवांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. लहानगी मंडळी जल्लोष करीत होती. विशेष म्हणजे, मुलांचा उत्साह पाहून वीटभट्टीवर आलेली सर्व मंडळी तब्बल दोन तास मुलांशी खेळत होती. पोटाची भूक भागविण्यासाठीची धडपड करणाऱ्या या चिमुकल्या जिवांना ही प्रेमाची भेट म्हणजे एक अफलातून भेट होती. यावेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर फुललेले, ओसांडून वाहणारे निरागस, कोवळ हास्य वेगळेच होते. दोन तासांच्या या कार्यक्रमानंतर आयोजक संतोष शिंदे यांनी प्रत्येक सण या मुलांसोबत घालवण्याचा संकल्प केला.
हेही वाचा - भिवंडीतील शेतकऱ्याने खरेदी केले 30 कोटींचे हेलिकॉप्टर