ठाणे - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यातील समूह विकास प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यावेळी या निर्णयाचे शिवसेनेच्या नेत्यांनी बॅनर लावून अभिनंदनही केले होते. मात्र, या प्रकल्पाच्या भूमिपूजनाला माजी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यास शिवसेना विसरली का? असा सवाल आमदार निरंजन डावखरे यांनी केला आहे. सोमवारी भाजपच्या ठाणे शहर अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा - 'हो हे माझ्या बापाचं राज्य, आम्ही बाप शोधायला गुजरातला जात नाही'
ठाण्यातील समूह विकास योजनेला आवश्यक मंजुरी मिळाली नसतानाही उद्घाटनाची लगीनघाई का? असा सवालही डावखरे यांनी उपस्थित केला. समूह विकास योजनेविषयी संभ्रम निर्माण झाल्यास तिची झोपडपट्टी पुनर्विकास योजना होईल, अशी टीका त्यांनी केली. समूह विकास योजनेच्या मंजुरीच्या वेळेस विद्यमान नगरविकास मंत्र्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. मात्र, आता त्यांना उद्घाटनास निमंत्रण देताना विसर का पडला, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा - तळोजा एमआयडीसीमध्ये अमोनिया वायूची गळती.. ग्रामस्थांना उलट्यांचा त्रास
या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी फडणवीस यांना बोलावले पाहिजे. शिवसेनेने योजनेचे श्रेय जरूर घ्यावे, भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला तीन दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत शिवसेना नेत्यांना सुबुद्धी होईल, असा टोलाही डावखरे यांनी लगावला. समूह विकास योजनेच्या अर्बन रिन्युअल प्लॅनला मंजुरी मिळालेली नसून इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल देण्यात आलेले नाही. त्यामुळे ई-भूमीपूजन करण्यासाठी लगीनघाई का केली जात आहे? याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले. तसेच गावठाणे, कोळीवाडे वगळण्याबाबत भूमिका जाहीर करावी, असे आवाहनही निरंजन डावखरे यांनी यावेळी केले.
क्लस्टर डेव्हलपमेंट नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय - एकनाथ शिंदे
दुसरीकडे क्लस्टर डेव्हलपमेंट हा ठाण्यात धोकादायक, अतिधोकादायक इमारतीत जीव मुठीत धरून राहाणाऱ्या लाखो नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे पुढे म्हणाले की, कृपया याबाबत विरोधकांनी कुठल्याही प्रकारचे राजकारण करू नये. नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांना फायदा होईल, अशाच पद्धतीने क्लस्टरची अंमलबजावणी पूर्ण नियमांनुसार सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊनच केली जाणार आहे. याबाबत कोणाच्या मनात शंका असायचे कारण नाही. क्लस्टर योजनेत अनधिकृत इमारतीत राहाणाऱ्या लोकांना अधिकृत घरे मिळणार आहेत. लीजवरची घरे कायमस्वरुपी मालकीची होणार आहेत. यासंदर्भात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची काळजी घेऊनच काम सुरू आहे. कोणाच्या काही सूचना असल्यास त्यांचे स्वागतच आहे. ठाण्याचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेल्या सार्वजनिक हिताच्या या प्रकल्पात अडथळा न आणता प्रत्येकाने मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले आहे.