ठाणे - पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीच्या पार पोहोचले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आधीच कोरोनामध्ये काममधंदे बंद झाल्याने पिचून गेलेल्या सामान्य नागरिकाला आता जगणे अशक्य झाले आहे. त्यामुळे या महागाईविरोधात आज शिवसेनेतर्फे सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
अन्यथा तीव्र आंदोलन -
या आंदोलनादरम्यान बैलगाडी, घोडगाड्या आणि सायकल घेऊन मोर्चेकारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेले असताना हा मोर्चा पोलिसांनी टेम्बीनाका येथे अडवला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच केंद्राने लवकरात लवकर कर माफ करून पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस स्वस्त करावे, अन्यथा याहून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला. यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा - जगविख्यात लोणार सरोवराची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी