ठाणे : भाजपाने देशभर 'अब की बार 400 पार'ची घोषणा करत कार्यकर्त्यांना तसा प्रचार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भाजप कार्यकर्ते प्रत्येक घरावर पक्षाचे चिन्ह कमळ रेखाटण्यासह मोदी सरकारच्या योजना नागरिकांपर्यत पोहचविण्याचे काम करीत आहेत. मात्र भाजपाच्या या प्रचाराला शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत, भितींवर रेखाटलेले कमळ पुसले. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकत्यांमध्ये बाचाबाची झाली. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरात घडली आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या भाजपा कार्यकत्यांनी शिंदे गटाच्या चार कार्यकर्त्यांवर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचार : विशेष म्हणजे ज्या परिसरात हा प्रकार घडला आहे. त्या परिसरात शिंदे गटाचे माजी नगरसवेक मल्लेश शेट्टी यांचे वर्चस्व आहे. या परिसरात भाजपा कार्यकर्ते आगामी महापालिका निवडणुकीचा प्रचार करताना भिंतीवर कमळ रेखाटत होते. त्यावरून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी भाजपा कार्यकर्ते सचिन कुरणे, रुपेश साळूंखे आणि जितू यांना मारहाण केली आहे. कल्याण पूर्वमध्ये भाजपाचे आमदार तर कल्याण लोकसभा मतदार संघात डॉ. श्रीकांत शिंदे खासदार आहेत.
शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा : शिवसेना भाजपाची युती आहे. परंतु, शिवसेनेला बाजूला सारून केवळ भाजपाचा प्रचार करण्याचे कृत्य शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना पचनी पडले नाही, असे या घटनेवरून समोर आले. यामुळेच सुरुवातीला त्यांनी अशा प्रकारचा एकतर्फी प्रचार करू देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी करताच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाद घालत आपण पक्षादेश पाळत आहे, असे सांगितले. या घटनेमुळे संतापलेल्या भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आणि माजी परिवहन संदस्य संजय मोरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शिंदे समर्थकांच्या विरोधात तक्रार दाखल केली. सकाळपासून तक्रार दाखल करण्याची मागणी करणाऱ्या शिंदे समर्थकावर गुन्हा दाखल करण्यात येत नसल्याने भाजपा कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला. दुपारनंतर पोलिसांनी शिंदे गटाच्या चार कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप : याप्रकरणी बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपा युती आहे. आपण पक्षादेश पाळत प्रचार करत होतो. मात्र, काही कार्यकर्ते परिणामांचा विचार न करता कायदा हातात घेतात. आज घडलेल्या घटनेबाबत वरिष्ठांशी बोलून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकावर मारहाणीचा आरोप केला. त्यांचे नाव न घेताच प्रतिक्रिया सूर्यवंशी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा :
- Shinde Faction Bjp Dispute विधान परिषद निवडणुकीत भाजप विरोधात प्रहार निवडणूक रिंगणात, शिंदे गट व भाजपमध्ये फूट पडण्याची शक्यता
- MLA Sanjay Gaikwad Threatened : 'गद्दार' संबोधल्यामुळे ठाकरे, शिंदे गट आमनेसामने; आमदार संजय गायकवाड यांची पदाधिकाऱ्याला धमकी
- Shiv Sena Activist Murder : शिंदे गटाच्या शाखा प्रमुखाची जुगार अड्ड्यावर निर्घृण हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद