मीरा भाईंदर(ठाणे)- मीरा भाईंदर शहरातील अनेक विकासकांमाचे ऑनलाइन उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज पार पडले. मात्र, कार्यक्रमास्थळी सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या वतीने महापौरांनी एक प्रेस नोट प्रसिद्ध करून बी.एस.यु.पी. योजना आणि तसेच स्व. बाळासाहेब ठाकरे समर्पित कोविड रुग्णालयाला विरोध दर्शविला. कार्यक्रमस्थळीच घडलेल्या या प्रकारावर आमदार प्रताप सरनाईक यांनी महापौर राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधाला प्रत्युत्तर दिले आहे.
महापौरांनी का केला विरोध?
मीरा भाईंदर शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाला आहे. तसेच नियंत्रणात आल्यामुळे मीरा भाईंदर महानगरपालिके तर्फे समृद्धी कोविड सेंटर, डेल्टा गार्डन कोविड सेंटर हे दोन्ही सेंटर यापूर्वी बंद करण्यात आले आहेत. त्यातच नवीन कोविड रुग्णालयासाठी १२ कोटी राज्य सरकारने मंजूर केले होते. त्यातून स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालयाची निर्मिती झाली. मात्र, हे रुग्णालय सद्यस्थितीत सुरू न करणेबाबतचे एक महापौर यांनी ०६ नोव्हेंबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. तसेच बी.एस.यु.पी.योजनेचे भूमिपूजन या अगोदर दोन वेळा झाले आहे. त्यामुळे पुन्हा उद्घाटन कार्यक्रम करणे योग्य नाही, उद्घाटन थांबबाबे, असे महापौर जोस्ना हसनाळे यांनी पत्रात म्हटले आहे.
महापौरांना आमदार प्रताप सरनाईकांचे प्रतिउत्तर-
खासगी हॉस्पिटलची दलाली करत आहे. म्हणून भाजप विरोध करत आहेत. कोविड सेंटर खाली राहिले तरी चालेल. मात्र रुग्णांना त्रास होऊ नये, बेडची कमतरता भासू नये. महापौर राजकारण करत आहेत असा आरोप आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. मीरा भाईंदर शहरात विकासाची गंगा वाहत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे समर्पित कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले आहे. स्पेन, अमेरिका, दिल्ली सारख्या शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. म्हणून हे नवे रुग्णालय सुरू करण्यात येत आहे. सध्यस्थितीत रुग्णालयातील खाटा रिकाम्या राहिल्या तरी चालतील. मात्र भविष्यात रुग्णांना त्याची कमतरता भासू नये, म्हणून हे सरकार काम करत असल्याचे आमदार सरनाईक यांनी महापौरांना प्रत्युत्तर दिले आहे.