ठाणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसैनिक हे महाराष्ट्रभरात आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी भाजपा कार्यकर्ते आणि शिवसैनिकांत वादावादी होताना दिसत आहे. यातच ठाण्यातील उल्हासनगरात शिवसैनिकांनी भररस्त्यात एका भाजपा नगरसेवकाला मारहाण करत त्याच्या तोंडाला काळे फासल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करून तोंडाला काळे फासलेल्या भाजपा नगरसेवकाचे प्रदीप रामचंदानी असे नाव आहे.
शिवसेनेबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य -
नगरसेवक प्रदीप रामचंदानी हे शिवसेनेबद्दल तसेच शिवसेनेच्या नगरसेवकांवर वारंवार सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. त्यामुळे भाजप नगरसेवकाला मारहाण केल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे. तर आपण उल्हासनगर शिवसेना शहर प्रमुखांच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी करत असल्याने आपल्यावर हा हल्ला झाल्याचे भाजप नगरसेवक रामचंदानी यांनी स्पष्ट केले आहे. तर याप्रकरणी हल्लेखोर शिवसैनिकांवर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार अयलानी यांनी दिली आहे.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट -
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यलयासमोर असलेल्या कार्यालयातून भाजप नगरसेवक रामचंदानी हे दुपारच्या सुमारास महापालिका मुख्यालयात जात असतांना त्यांना शिवसैनिकांनी गाठून भररस्त्यात खाली पाडले. त्यानंतर तोंडाला शिवसैनिकांनी काळे फासले. मात्र अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे भाजप नगरसेवक व त्यांचा मुलगा घाबरून गेले. तर परिसरातही घबराटीचे वातावरण पसरले होते. त्यांनतर काही नागरिकांनी त्यांना रस्त्यावरून उचलत शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असे, कुमार अयलानी यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - जाणून घ्या, नारायण राणे संदर्भात आज दिवसभरात नेमके काय घडले