ठाणे : अंबरनाथ तालुक्यातील मलंग गडावर माघी पौर्णिमेनिमित्त मोठा जत्रोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. या उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडावर पूजाअर्चा करण्यासाठी आज दुपारच्या सुमारास आले होते. विशेष म्हणजे हा जत्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी मलंगगडावरील हिंदुंची वहिवाट आणि तेथील धार्मिक परंपरा जपण्यासाठी हक्काचा लढा सुरू आहे. त्यातच राज्यातील सत्ता संघर्षामुळे ठाकरे - शिंदेमध्ये गटतट पडल्याने दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत लाखो रुपये खर्च करून हजारोच्या संख्येने बॅनरबाजी करत भाविकांसाठी जेवणाची, पाण्याची सुविधा केली. मात्र, एकाही सौचालायाची व्यवस्था केली नसल्याने भाविकांना उघडावरच नैसर्गिक विधीसाठी उरकावा लागत असल्याचे चित्र दिसून आल्याने पंतप्रधान मोदींच्या स्वछ भारत अभियानाचा अक्षरशः फज्जा उडाला आहे.
एकनाथ शिंदे गडावर : शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी १९८० पासून मलंग गडावर माघी पौर्णिमेनिमित्त उत्सवास सुरूवात केली. ५० वर्षाहून अधिक काळ ही उत्सव परंपरा सुरू असून आनंद दिघे यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा लढा पुढे चालू ठेवला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यादांच मलंग गड यात्रोत्सवाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टरने दर्शन सोहळ्यासाठी गडावर आज आले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मलंगगडावर येऊनही गडावरील अनेक वर्षाचा पाणी प्रश्न, रस्ते, पायवाटा, बाजारपेठ रचना, फ्युनिक्युलर ट्राॅलीचा मागील १० वर्षापासून रेंगाळलेला प्रकल्प, गड परिसरातील रस्ते, पाण्याचे प्रश्न मार्गी लागला नसल्याने स्थानिक गावकऱ्यासह भाविकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत असल्याचे दिसून आले.
मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्राॅलीचा विषय रखडला : विशेष म्हणजे मलंगगडावर जाण्यासाठी रोप वेची व्यवस्था नसल्याने भाविकांना दोन तास गडावर पायी चालत जावे लागते. भाविकांना १० मिनिटात गडावर जाता यावे म्हणून मलंग वाडी ते गड दरम्यान फ्युनिक्युलर ट्राॅलीचा प्रकल्प १० वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात हाती घेण्यात आला होता. सरकारे बदलली. निधीचे प्रश्न निर्माण झाले. जुने ठेकेदार देयक थकल्याने कामे सोडून निघून गेले. त्यामुळे मलंगगडावरील फ्युनिक्युलर ट्राॅलीचा विषय रखडला, असे खुद्द मुखमंत्र्यांनी आज कुबली देत, पुढील वर्षींत नक्कीच ट्राॅलीचा विषय मार्गी लावण्याचा शासन पातळीवर प्रयत्न केला जाईल असे सांगत पत्रकारांच्या इतर प्रश्नांना उत्तर देण्यास टाळून हेलिकॉप्टरने गडावर दर्शनासाठी रवाना झाले.
नकली हिंदुत्ववादी निर्माण झालेत : माघ पौर्णिमेला दरवर्षी मलंगडावर मोठी यात्रा भरते. यावेळी विधानसभेचे ठाकरे गटाचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेसह ठाण्याचे खासदार राजन विचारे यांच्यासह मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक देखील मलंगडावरील मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी दाखल झाले. विशेष म्हणजे मलंग गड परिसरात ठाकरे गट आणि शिंदे गट हे दोन्ही गटाचे जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री देखील एकनाथ शिंदे हे मच्छिंद्रनाथाच्या दर्शनासाठी हेलिकॉप्टरने दाखल झाल्याने विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आम्ही पुन्हा येणार असल्याचा सूर आवळत अनेक नकली हिंदुत्ववादी निर्माण झालेत. असे नाव न घेता बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर त्यांनी टीका केली. तर मुख्यमंत्री गडावर हेलिकॉप्टने जातील मात्र भाविकांसाठी मूलभूत सुविधा दिल्या नसल्याची टीका खासदार राजन विचारे करत मुख्यमंत्र्यावर निशाणा साधाला.
शौचालय मोडकीस अवस्थेत : पौर्णिमेनिमित्त ठाणे, मुंबई, पालघरसह राज्याच्या विविध भागातील हिंदू - मुस्लिम भाविक मलंग गडावर दर्शनासाठी येतात. या उत्सव कार्यक्रमात हिंदू महासभा, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदू मंच या हिंदू धर्म संघटना सहभागी झाल्या आहेत. मुख्यमंत्री गडावर येणार असल्यामुळे मलंग गड संस्थान कार्यक्रम भव्यदिव्य व्हावा म्हणून कामाला लागले. दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेसाठी महसूल, पोलीस यंत्रणांनी सुसज्जतेसाठी सुरक्षा यंत्रणेचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र मलंगगड ग्रामपंचायत समोरचेच सार्वजनिक शौचालय मोडकीस अवस्थेत होते. तर गडाच्या पायथाशी केवळ टँकरने पाणी आणून टाकीची व्यवस्था करण्यात आली. तसेच येणाऱ्या हजारो भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था ठाकरे - शिंदे गटाकडून करण्यात आली.
भाविकांची नैसर्गिक विधीसाठी कुचुंबना : तर दुसरीकडे मलंगगडावर बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी कल्याण एसटी डेपोमधून ५० जादा बसेस सोडून दिवसभरात २०० फेऱ्या करत आहेत. मात्र मलंगगड बस डेपोत जीर्ण झालेल्या इमारती व परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी सौचालायाची व्यवस्था केली नसल्याने खास करून महिला भाविकांची नैसर्गिक विधीसाठी कुचुंबना झाल्याचे पाहवयास मिळले आहे. विशेष म्हणजे मलंगगड मुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात असल्याने गेल्या ८ वर्षांपासून या परिसरात केवळ गडाच्या पायथ्याशी पर्यंत रस्त्याची कामे झाल्याचे दिसून आले आहे.