ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ( Wagle Estate Premises ) पुन्हा एकदा शिवसेनेचा ठाकरे आणि शिंदे गट ( Thackeray and Shinde group of Shiv Sena ) आमनेसामने आले आहेत. या घटने दरम्यान दोन्ही गटात कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. या मारहाणीत ठाकरे गटाचा एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्याच्यावर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात ( Civil Hospital in Thane ) उपचार सुरू आहे. सध्या श्रीनगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
नवीन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू : सध्या ठाकरे गटाकडून नवीन कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक प्रक्रियेदरम्यान गेल्या आठवड्यात ठाकरे गटाकडून ठाणे उपजिल्हाप्रमुख म्हणून संजय घाडीगावकर ( Sanjay Ghadigaonkar ) यांची नियुक्ती करण्यात आली होती. संजय घाडीगावकर हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघातील आहेत. या संजय घाडीगावकर यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्या निमित्त ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ठाकरे गटाचे ठाण्याचे खासदार राजन विचारे, उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर उपस्थित होते.
दोन्ही गट आमनेसामने : शिंदे गटाचे माजी नगरसेवक योगेश जानकर हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत जात असताना दोन्ही गट आमनेसामने आले आणि दोन्ही गटात घोषणाबाजी झाली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली आणि बाचाबाचीचे रूपांतर हे हाणामारीत झाले आहे. यावेळी शिंदे गटाकडून आमच्या अंगावर कोणी आले तर सोडणारा नाही, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. तर ठाकरे गटाकडून या प्रकरणात जे दोषी आहेत, त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी ठाकरे गटाकडून अशा प्रकारचे कृत्य केले गेले असल्याचे आरोप प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे.