ठाणे : उल्हासनगर शहरात शिंदे गटाच्या शिवसेना शाखा प्रमुखाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. शब्बीर शेख असे हत्या झालेल्या शाखा प्रमुखाचे नाव आहे. शब्बीर शेखवर 7 ते 8 जणांच्या टोळीने धारदार शस्त्राने वार केले होते. ही घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प क्रमांक 5 या भागातील जय जनता कॉलनीमध्ये घडली. या भागात शब्बीर शेख हा मटका जुगाराचा अड्डा चालवत होता. दरम्यान या हत्येप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात 7 ते 8 जणांच्या टोळीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूर्व वैमनस्यातून झाली हत्या : शब्बीरवर झालेल्या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. या फुटेजनुसार, ही हत्या पूर्व वैमनस्यातून झाली असल्याचे दिसत आहे. दरम्यान या हल्ल्यात मृत झालेला शब्बीर हा उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच या भागातील जय जनता कॉलनीमध्ये कुटुंबासह राहत होता. याच भागात राहणारा दुसऱ्या टोळीतील विक्रम नावाच्या गुंडांशी शब्बीरचे काही दिवसापूर्वी पूर्ववैमनस्यातून भांडण झाले होते. याच कारणामुळे शब्बीरची हत्या झाली. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जय जनता कॉलनीमध्ये असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर शब्बीर होता. त्यावेळी 7 ते 8 गुंडांनी त्याच्यावर धारदार चाकू आणि चॉपरने हल्ला केला. शब्बीर त्या हल्लेखोरांपासून आपला बचाव करण्यासाठी तेथून पळ काढत होता. परंतु हल्लेखोरांनी त्याला पकडले आणि त्याच्या अंगावर सपासप वार करत त्याला ठार केले.
उपचार घेताना झाला मृत्यू : हल्लेखोरांनी शब्बीरवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला होता. चाकू आणि चॉपरचे 10 ते 12 वार शब्बीरवर करण्यात आले होते. यामुळे शब्बीर गंभीर जखमी झाला होता. तो मृत झाल्याचे समजून हल्लेखोर तेथून निघून गेले. त्यानंतर तेथील काही लोकांनी शब्बीरला क्रिटी केअर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. परंतु त्याची अवस्था गंभीर होती, त्यामुळे त्याला कल्याण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार घेत असतानाच शब्बीरचा मृत्यू झाला.
पोलिसांचा तपास सुरू : याप्रकरणी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात विक्रमसह त्याच्या टोळीतील 8 जणांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू घेण्यासाठी स्थानिक पोलिसांसह उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला आहे. ही हत्या का करण्यात आली याची माहिती अद्याप पोलिसांना मिळालेली नाही. त्यामुळे जोपर्यत मुख्य आरोपी पडकला जात नाही तोपर्यत हत्येचे खरे कारण पुढे येणार नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा -