ठाणे : कचोरी म्हटले की, सगळ्यात पहिले आठवण होते ती विदर्भातील शेगावच्या कचोरीची. याच शेगावच्या कचोरीचा अस्सल स्वाद अनुभवायला मिळतो चक्क ठाण्यामध्ये. ठाण्यातील नौपाडा येथील शेगांव कचोरी सेंटर गेली १४ वर्षे अविरतपणे ठाणेकरांना अस्सल शेगांव कचोरीची लज्जत मिळवून देत आहेत. ठाणेकर नागरिक हा खवय्या म्हणून ओळखला जातो. कारण ठाण्यातील प्रत्येक गल्लीमध्ये एक खाऊगल्ली ही असतेच.
खाऊगल्ल्यांमध्ये शेगांव कचोरीचे स्टॉल : प्रत्येक खाऊगल्लीमध्ये तेथील विशिष्ट स्थानिक समुदायाच्या आवडीचे पदार्थ विकले जातात. जसे सिंधी समाज प्रामुख्याने असलेल्या भागात दलपक्वान, पापडी चाट सारखे पदार्थ मिळतात. तर, गुजराती बहुल भागात ढोकळा, फाफडा जिलेबी सारख्या पदार्थांचे स्टॉलची गर्दी पहायला मिळते. परंतु आत्तापर्यंत याला वडापाव हा एकच अपवाद होता, जो सगळीकडेच आढळतो. परंतु गेल्या काही वर्षात याच खाऊगल्ल्यांमध्ये शेगांव कचोरीचे स्टॉल आपले वेगळेपण दाखवत आहेत.
ठाणेकरांना कचोरीची भुरळ : जे भाविक गजानन महाराजांच्या पावनभूमी शेगावात जाऊन येतात. त्यांना या कचोरीची भुरळ पडलेली असतेच. परंतु ज्या खवय्यानी एकदा का या खुसखुशीत कचोरीची चव घेतली, तो या कचोरीचा आजीवन चाहता झालाच म्हणून समजा. श्रीक्षेत्र शेगाव येथील रेल्वे स्थानाका समोरील आर एस शर्मा शेगांव कचोरी यांनी ५० वर्षांपूर्वी या कचोरीची सुरुवात केली असे सांगतात. इथेच अस्सल शेगांव कचोरी मिळते असे येथील रिक्षावाले आवर्जून दावा करतात. बहुतांश ठाणेकरांना या कचोरीची फारशी माहिती नसताना नौपाडा भागात एका छोटयाशा दुकानातून शेगांव कचोरी विक्रीला सुरुवात झाली आणि ठाणेकरांना या कचोरीची भुरळ पडली.
दुकानात खवय्यांची एकच गर्दी : गेली १४ वर्षे आपल्या कचोरीची चव अबाधित ठेऊन सातत्याने ठाणेकरांच्या पसंतीस येथील कचोरी उतरली आहे. ज्याचे द्योतक याचा खप आहे. दरदिवशी जवळपास १२०० पेक्षा जात कचोऱ्या या एका दुकानातून विक्री होतात. असे या कचोरी सेंटरचे मालक अभिमानाने सांगतात. संध्याकाळी तर, दुकानात खवय्यांची एकच गर्दी होते. ठाणेकर खवय्ये कचोऱ्या स्वतः तर खातातच परंतु आपल्या कुटुंबियांसाठी बांधून देखील नेतात. आत फारसारण न भरता केलेली ही खुसखुशीत आणि गरमागरम कचोरी, तळलेल्या मिर्ची सोबत खाणे म्हणजे खवय्यांसाठी एक पर्वणीच असते. त्यामुळेच या दुकानाला आणि येथील कचोरीला रसिक ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
भारताबाहेर देखील उपलब्ध होते कचोरी : भारताबाहेर असणाऱ्या नागरिकांनाही कचोरीची चव चाखता येऊ शकते. पुण्यातील एका उद्योजकाने व्यवस्थित पॅकिंग करून परदेशातही कचोरी उपलब्ध करून दिली आहे. ती कचोरी कच्च्या स्वरूपात पाठवली जात असून तिला व्यवस्थित पॅकिंग केल्यामुळे ती खराब होत नाही.
कचोरीने मिळवला आयएसओ मानांकन : शेगाव येथील कचोरीचे आयएसओ नामांकन देखील मिळालेले आहे. 2013 साली स्वच्छता, गुणवत्ता, सेवा असे निकष पार पाडल्यानंतर कचोरीला आयएसओ मानांकन मिळाले आहे.
हेही वाचा - Shiv Sena : शिवसेनेची संपत्ती शिंदेंच्या रडारवर! उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसणार?