ठाणे - कोरोना विषाणूंच्या धास्तीने नागरिकत्व कायद्याविरोधात भिवंडीत 47 दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन अंशतः स्थगित करण्यात आले आहे. संविधान बचाव संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली.
कोरोनाचा संसर्ग संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पसरत असल्याने राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला. ज्यामध्ये अनावश्यक गर्दी टाळण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यातच भिवंडी शहरात 47 दिवसांपासून सुरू असलेले शाहीनबाग आंदोलन अंशतः स्थगित करत रात्रीच्या वेळी महिला या ठिकाणी थांबणार नसून फक्त दिवसभर काही मोजक्या महिला या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेत तोंडावर मास्क लावून आंदोलनात सहभागी होणार आहे. मात्र, रात्रीच्यावेळी सर्व आंदोलनकारी महिला आपापल्या घरी जाणार आहेत, अशी माहितीही संविधान बचाव संघर्ष समितीचे निमंत्रक अॅड. किरण चन्ने यांनी दिली आहे .
संविधान बचाव संघर्ष समिती वतीने भिवंडीतील मिल्लत नगर वंजारपट्टी नाका या ठिकाणी 47 दिवसांपासून महिला नागरिकत्व सुधारणा कायद्या विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यास शहरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत दररोज हजारो महिला सायंकाळी एकत्रित होत असतात. पण, सध्या कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याने त्या बाबत दक्षता घेण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहे. यामुळे आंदोलन 31 मार्चपर्यंत अंशतः स्थगित करीत असून ज्या महिला येणार आहेत, त्यांनी स्वतःची काळजी घेत आरोग्य विषयक जनजागृती या शाहीनबाग आंदोलनात सहभागी होत आहेत.
या आंदोलनात येणाऱ्या मुस्लीम महिला या बुरखाधारी व पाच वेळच्या नमाजासाठी वजू करून येत असल्याने साहजिकच महिला वैयक्तिक स्वच्छता बाळगत असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरही समिती आयोजकांनाकडून महिलांची विशेष काळजी घेण्यात येत असून वैद्यकीय दक्षता घेतली जात असली तरी कोरोनाच्या भीतीने आम्ही कोणताही धोका न पत्करता काही मोजक्या महिला आंदोलन सुरू ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्या महिलेने दिली आहे.
हेही वाचा - केडीएमसी कर्मचाऱ्यांसह पोलीस-आरोपींना 2 हजार मास्क आणि सॅनिटायझरचे मोफत वितरण