ठाणे - मानपाडा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या चेंबरमधून उग्र वासाचे रासायनिक सांडपाणी पोलीस ठाण्याच्या आवारातच साचले आहे. या सांडपाण्याच्या उग्र दर्पामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना भयंकर त्रासाचा सामना करावा लागत आहे.
डोंबिवलीच्या औद्योगिक विभागातील फेज 1 पट्ट्यात गुरूवारी सायंकाळी वायू प्रदूषणाचा त्रास नागरिकांना जाणवू लागला. नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिसांना तत्काळ बोलावून ही समस्या सांगितली. या उग्र वासामुळे काही नागरिकांना श्वसन, मळमळणे आणि उलट्याचा त्रास झाला. तरीही प्रदूषण नियंत्रण महामंडळाने 24 तास उलटूनही या गंभीर समस्येकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. डोंबिवली शहरातील औद्योगिक विभागात अनेक रायायनिक कंपन्या असून त्यातून अधूनमधून तीव्र स्वरुपाचे वायू प्रदूषण होते. तसेच नाल्यांमध्ये कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक सांडपाणी सोडण्यात येते. त्यामुळे परिसरातील रहिवाशांना त्याचा खूप त्रास होतो.
हे वाचलं का? - प्लास्टिक प्रदूषणामुळे महासागर तुंबतायत; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली चिंता..
मानपाडा पोलीस ठाण्यासमोरील कल्याण-शिळ रस्त्याच्या दुतर्फा राहणाऱ्या नागरिकांना अचानक वायू प्रदूषणाचा त्रास जाणवू लागला. या वासामुळे परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा तसेच उलटय़ांचा त्रास जाणवू लागला. त्यातच मानपाडा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या चेंबरमधून उग्र दर्पाच्या सांडपाण्याचा उफळा बाहेर पडत आहे. दुर्गंधीयुक्त हे रासायनिक सांडपाणी पोलीस ठाण्याच्या आवारात साचले. चेंबरमधून बाहेर पडलेल्या या सांडपाण्याच्या उग्र दर्पामुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि कामासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांना भयंकर त्रासाचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी नागरिकांसोबत या चेंबरची पाहणी केली. मात्र, या प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थितांना पडला.
हे वाचलं का? - 'प्लास्टिक द्या अन् डस्टबिन घेऊन जा' - पालिकेचा सामाजिक संस्थांसोबतचा उपक्रम
एमआयडीसी परिसरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या 70 टक्के पाईपलाईन फुटलेल्या आहेत. त्यातून रसायनमिश्रित पाणी बाहेर वाहते. या प्रश्नावर मागील २ वर्षांपासून पाठपुरावा करूनही एमआयडीसी हे काम करू शकलेली नाही. वायू प्रदूषणाचा त्रास कमी होण्यासाठी गॅस पंपिंग स्टेशन उभारायला हवे, अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोपही यापूर्वी वारंवार करण्यात आला आहे. कारखानदारांकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना हप्ते मिळत असल्यानेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. मध्यंतरी प्रदूषणाचा त्रास होत नव्हता. मात्र, गेल्या ३ महिन्यांपासून अचानक प्रदूषण कसे वाढले? कोणत्या कंपन्यांतून कोणता वायू बाहेर जातो? कोणती कंपनी प्रदूषणास जबाबदार आहे. हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहीत असल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. रहिवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या कंपन्या बंद करण्याची मागणी या निमित्ताने पुढे येत आहे.
हे वाचलं का? - तारापूर औद्योगिक क्षेत्रात रात्रीच्या वेळी टँकर बंदी
डोंबिवली एमआयडीसीत एकूण 310 कारखाने आहेत. सांडपाणी वाहून नेणारा भोपर व खांबाळपाडा नाला करण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे. त्यामुळे प्रदूषणाला एमआयडीसीच जबाबदार असल्याचा आरोप केला जातो. मात्र, एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळ एकमेकांकडे बोट दाखवत असतात. प्रदूषणाची जबाबदारी ही प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीतील उत्पादनाचे नमुने घेऊन त्याचा अहवाल एमआयडीसीला देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठपुरावा करूनही तपासणी अहवाल अद्याप मिळालेला नाही. मंडळ सहकार्य करत नसल्याचे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात. सांडपाण्याच्या नाल्यांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी एमआयडीसीची असूनही ही कामे केली जात नाहीत. बेकायदा बांधकामेही वाढल्याचा आरोप उद्योजक एमआयडीसीवर करत आहेत.
या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी चिंता व्यक्त केली. पोलीस ठाण्यातही माणसेच असतात. प्रदूषणाचा त्रास होणे साहजिकच असले तरी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली पाहिजे. मोठा पाऊस झाला की रस्त्याच्या पलीकडे असलेल्या अनंतम रेसिडेन्सी, दावडी, सोनारपाडा भागातील पाणी वाहून अलीकडच्या भागात येते. या भागात कापडावर प्रक्रिया करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. या कंपन्यांतील सांडपाणी पाईपलाईनमार्फत वाहून गेले पाहिजे. मात्र, तुंबलेले चेंबर साफ करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. यासाठी आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि केडीएमसीचे पत्राद्वारे लक्ष वेधणार आहोत, असेही पोलीस निरीक्षक तांबे यांनी सांगितले.