ठाणे - जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेची विदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहायक सुरक्षा अधिकारी या पदावर निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्यावर पहिलीच जबाबदारी ऑस्ट्रेलिया येथे भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) आस्थापनेवरील सुरक्षा मिशनवर सोपविण्यात आली आहे. माया पाटील उर्फ आरती आनंद बेळगली, असे पोलीस नाईक असलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या भिवंडी तालुक्यातील अलिमघर गावातील रहिवाशी आहेत.
ठाणे शहर पोलीस दलात कार्यरत
आरती आनंद बेळगली या ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या विशेष शाखा आस्थापनेत महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच विदेश मंत्रालय भारत सरकारमार्फत निवड केल्या जाणाऱ्या सहायक सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे.आरती यांच्या एकूणच गुणवत्तेवर ऑस्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) कार्यालयाच्या आस्थापनेवरील मिशनवर नियुक्ती झाली आहे. त्या सध्या ठाण्यातील बाळकुम परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.
अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर निवड
विदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहायक सुरक्षा अधिकारी म्हणून होणारी निवड अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर केली जाते. त्यात इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे, वक्तृत्त्व, धाडसीपणा मेहनत घेण्याची तयारी सचोटी प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी गुणांसह खेळ, वाहन चालविणे इत्यादी कला गुणांचाही विचार केला जातो. या साऱ्या निष्कर्षांवर पोलीस नाईक आरती बेळगली यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविल्याने त्यांची निवड झाली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. ठाणे पोलीस दल व शहर परिसरातील मित्र परिवाराकडून आरती यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा - ठाणे जिल्ह्यातील ६८ हजार ३२६ विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी ४ कोटींचा निधी मंजूर