ठाणे - उल्हासनगरमध्ये एका शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. हे प्रकरण शाळा प्रशासनाकडून दाबण्याचा आटोकाट प्रयत्न चालू होता. मात्र, या गंभीर घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाल्याने हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर एक परिसरात झुलेलाल शिक्षण संस्थेची ही शाळा आहे. या शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरील वर्गात 50 ते 60 विद्यार्थी दुपारच्या सुमाराला अभ्यास करत होते. यावेळी अचानक खिडकीजवळ सिलिंग प्लास्टर विद्यार्थ्यांच्या डोक्यावर कोसळले. या घटनेत तीन विद्यार्थ्यांच्या डोक्यात आणि चेहर्यावर दुखापत झाली आहे. ही संपूर्ण घटना वर्गात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. मात्र, शाळा प्रशासनाकडून हा प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर काही वेळाने या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्याने शाळा प्रशासनाने याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या पालकांची समजूत काढली आहे. शाळा प्रशासनाने मात्र प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उल्हासनगरमधील ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही छताचे प्लास्टर कोसळून दोन ते तीन जणांचे बळी गेले आहे. मात्र, महापालिका धोकादायक इमारतींना नोटीस बजावण्यापलीकडे कारवाई करताना दिसत नाही. यंदाच्या पावसाळ्यातही महापालिकेच्या हद्दीत शेकडो इमारती धोकादायक असून त्यातील काही इमारती पालिकेने रिकाम्या केल्या आहेत. मात्र, येथील रहिवाशांना कुठल्याही प्रकारची मदत न करता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे, तर या शाळेत झालेल्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाला जाग आली असून त्यांनी घटनास्थळी भेट देऊन त्या इमारतीची पाहणी केली आहे.