ठाणे - महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा आणि व्हेंटिलेटर बेडचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. तातडीने उपाययोजना करून ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था करण्यात आली. मात्र, रुग्णालयांमध्ये सध्या एकही व्हेंटिलेटर बेडच नसल्याचे समोर आले आहे. लवकरच १०० व्हेंटिलेटरची उपलब्धता होणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
पालिकेचे एक रुग्णालय बंदच -
ठाणे महानगरपालिकेची ग्लोबल, पार्किंग प्लाझा आणि होल्टास ही रुग्णालये आहेत. यापैकी होल्टास रुग्णालय अद्याप सुरू झालेले नाही. पार्किंग प्लाझामध्ये ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा झाल्याने ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. सध्या पालिकेच्या कोवीड रुग्णालयात २ प्लांटमधून ३५० जम्बो सिलिंडर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, कळवा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे काम सुरू आहे.
रेमडेसिवीरचाही तुटवडा -
दुसऱ्या लाटे दरम्यान ठाणे पालिकेलाही रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवला. पालिका प्रशासनाने विविध कंपन्यांकडून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करून तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे इंजेक्शनचा पुरवठा कमी पडणार नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सांगितले. अन्य गरजूंना रेमडेसिवीर इंजेक्शनची व्यवस्था जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे होत असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. रुग्ण कमी झाल्याने सध्या मागणीही कमी झाली आहे. ठाण्यातील रुग्णसंख्येमध्ये हळूहळू घट होत आहे, असेही डॉ. शर्मा म्हणाले.
तिसऱ्या लाटेची तयारी सुरू -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उत्तराधार्थ ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लॅब, रुग्णवाहिका आदी साधन सामुग्रीने ठाणे पालिका सज्ज आहे. टप्प्याटप्प्याने १०० व्हेंटिलेन्टर उपलब्ध होणार आहेत. दुसऱ्या लाटेच्या अनुभवानंतर ठाणे पालिकेने अनेक उणीव भरून काढल्या आहेत. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने तयारी करीत असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली. सध्या ठाण्याचा डेथ रेट हा १.४ एवढा असून तो कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिलासादायक आहे. मृत्यूच्या आकड्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डॉ. शर्मांनी सांगितले.