ठाणे - लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेतील त्यांच्या रथाचे सारथी सलीमभाई मखाणी गेल्या 20 दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. अखेर गुरुवारी त्यांचे मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली आहेत. डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडीमध्ये राहणारे सलीम मखाणी हे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी भारतभर ऑक्टोबर 1990 दरम्यान काढलेल्या रथ यात्रेचे चालक होते.
भाजपातील सर्व बड्या नेत्यांशी मखाणी यांचे अतिशय जवळचे संबंध होते. 4 जुलैच्या रात्री त्यांच्यावर भयंकर प्रसंग ओढवला होता. फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, बेड न मिळाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये खुर्चीवर ऑक्सिजन सिलेंडर हातात धरून बसून रहावे लागले. ही माहिती मिळाली असती, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे उपचारांसाठी वेळीच मदत मिळाली आणि सलीमभाईंची प्रकृती स्थिरही झाली होती. मात्र, कोविड - 19 विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने भायखळ्याच्या मदिना हॉस्पिटलमध्ये तब्बल 20 दिवस मृत्यूशी झुंज देत असताना, गुरुवारी त्यांनी एक्झिट घेतली.
त्यांच्यासाठी आटोकाट प्रयत्न करणाऱ्या खोजा समाजाने त्यांच्या पार्थिवावर मुंबईच्या डोंगरी येथील कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले.
चतुर्थी, एकादशी करायचे सलीमभाईं -
सलीमभाई यांच्या निधनाने केडीएमसी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनमध्ये कधीही भरून न येणारी एक पोकळी निर्माण झाली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे ते म्हणजे एक जिवंत उदाहरण होते. अत्यंत श्रद्धेने ते घरी गणपती बाप्पा बसवायचे. संकष्ट चतुर्थी, एकादशीचे कडक उपास करायचे. तसेच तितक्याच भाविकतेने व श्रध्देने ते पवित्र रमझानच्या महिन्यात रोजे, उपवासही करायचे. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेचे चालक होण्याचा मानही त्यांना मिळाला. अशा व्यक्तीला अखेरचा सलाम आणि श्रद्धांजली त्यांच्या अनेक चाहत्यांनी अर्पण केली.