ठाणे - लॉकडाऊनची सर्वात जास्त झळ ही गरीब, कामगार आणि मजूरांना बसत आहे. त्यामुळे संत निरंकारी मंडळाने अशा नागरिकांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात गरजू कुटुंबियांना संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून मदत केली जात आहे. मुंबई मेट्रो सिटीमध्ये निरंकारी मिशनच्या मुंबई झोनकडून सुमारे 3000 हजारहून अधिक गरजु कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
निरंकारी मिशनकडून लॉकडाऊन कालावधीत या कुटुंबीयांना पुरेल इतके तांदुळ, गव्हाचे पीठ, डाळी, मीठ, साखर, तेल, मसाला, बिस्कीटे, चहापावडर इत्यादी जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या आहेत. मुंबईमधील विविध ठिकाणच्या सत्संग भवनमध्ये हे साहित्य वितरीत करण्यात आले. तर ज्यांना शक्य नव्हते त्यांच्या घरी पोहोच करण्यात आले. दरम्यान या सर्व प्रक्रियेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यात आले.
हेही वाचा... दिवे लावताना आगी लावल्या नाही म्हणजे मिळवले!
निरंकारी मिशनच्या मुंबई क्षेत्राचे प्रभारी भूपेंद्रसिंह चुघ यांच्या मार्गदर्शनाखाली कुलाबा ते भाईंदर, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ठाणे, पनवेल व उरण या विभागात साहित्यांचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे गरज पडल्यास मुंबईतील संत निरंकारी सत्संग भवन क्वारंटाईन(विलगता) कक्ष बनवण्यासाठी उपलब्ध केले जातील, असे मंडळाच्यावतीने प्रशासनाला कळवण्यात आले आहे. याची सुरवात म्हणून मुंबईतील चेंबूर स्थित मुख्य भवनमधील काही खोल्या मंडळाने आधीपासूनच राखून ठेवल्या आहेत, अशी माहिती भूपेंद्रसिंह चुघ यांनी दिली.