ठाणे : जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटना दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत. काही दिवसांपूर्वीच शहापूर, मुरबाड, कल्याण तालुक्यातील अनेक गोवंश चोरी करून त्यांची तस्करी होत असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला होता.
निर्जन परिसरातील खोलीत आढळली जनावरे : ग्रामीण भागात शेतकऱ्यांची जनावरे चोरीला जात असल्याच्या घटनात वाढ झाली आहे. यामुळे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी गोवंश तस्करांविरुद्ध कठोर कारवाई करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची योजना आखली. २४ जून रोजी कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडवली जवळ असलेल्या राये गावात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आलेल्या ५० जनावरांची तस्करांच्या तावडीतून सुटका केली गेली. यामध्ये गाय व बैलांचा समावेश असून ते निर्जन परिसरातील अनधिकृत व अर्धवट बांधलेल्या अनेक चाळीच्या खोल्यात डांबून ठेवल्याचे ग्रामीण पोलिसांनी मारलेल्या छापेमारीत समोर आले.
'या' पोलिसांची तत्परता आली कामी: या छापेमारीत मुरबाड उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे, मुरबाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे, कुळगांव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोई, कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, यांच्यासह आरसीएफ प्लाटूनचे पथक आणि कल्याण ग्रामीण तालुका पोलीस ठाण्याचे 25 ते 30 पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यासह बजरंग दलचे संजय भोईर, लक्ष्मीकांत पाठक इतर कार्यकर्त्यांसह राये गावातील पडक्या बांधकाम असलेल्या चाळीतून ५० जनावरांची सुटका करत ही कामगिरी फत्ते केली. जप्तीतील गोवंश हे कत्तलीसाठी आणले होते की अन्य कशासाठी? याचाही तपास कल्याण ग्रामीण पोलीस करीत असल्याची माहिती कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा: