ठाणे - डोंबिवली रेल्वे स्थानकसमोरील धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या बाळकृष्ण मंगल कार्यालयाची इमारत आज दुपारच्या सुमारास कोसळली. या धोकादायक इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळला होता. स्लॅब कोसळलेल्या मजल्यावर हॉटेलचे काही कर्मचारी राहत होते. मात्र, सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.
या घटनेनंतर ही इमारत पालिका प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने तातडीने रिकामी करून घेतली. या इमारतीच्या तळमजल्यावर दुकान तर पहिल्या मजल्यावर साई पूजा नावाचे हॉटेल आहे. दुसऱ्या मजल्यावर बाळकृष्ण मंगल कार्यालय असून तिसरा आणि चौथा मजला विनावापर पडुन होता.
दरम्यान, या इमारतीच्या मालकाला इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटसाठी नोटीस देण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, ऑडिट न करता ऑडिटचा प्रश्न रेंगाळत ठेवल्याने हा प्रकार घडल्याचा महापालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी आरोप केला आहे. तरी त्या व्यवसायिकांचे योग्य ते पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासन शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक राजेश मोरे यांनी दिले आहे.