ठाणे - एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरमध्ये ग्रीन्स इंग्लिश स्कूलजवळील शाम खिस्ते यांच्या विसावा बंगल्यात शनिवारी पहाटे घरफोडी झाली. खिडकीच्या ग्रील कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील सर्व सामान, कपडे बाहेर काढून इतस्ततः फेकून दिले. परंतु चोरट्यांना मौल्यवान वस्तू, दागिने, रक्कम, इत्यादी काही न मिळाल्याने हात हलवत परत जावे लागले.
शाम खिस्ते हे लॉकडाऊनपूर्वी आपल्या बंगळुरू येथील मुलाकडे राहण्यास गेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना डोंबिवलीत येता आले नाही. शनिवारी सकाळी खिस्ते यांना बंगला फोडल्याची घटना समजल्यावर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. लॉकडाऊनच्या काळातही घरफोडी झाल्यामुळे परिसरातील रहिवाशांना धक्का बसला आहे. मिलापनगरमध्ये अनेक ठिकाणच्या स्ट्रीटलाईट बंद आहेत. त्यात सदर बंगल्यासमोरच्या रोडवरील स्ट्रीटलाईट बंद आहेत. त्यामुळे त्याचा फायदा चोर, समाजकंटक घेत असल्याचे डोंबिवली वेलफेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे यांनी सांगितले.