ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात गुरुवारी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत सरासरी 96 मी. मी इतक्या पाऊस नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी तेरा झाडे व एक इलेक्ट्रिक पोल कोलमडून पडले आहेत. अग्निशमन व उद्यान विभागामार्फत सर्व झाडे व पोल उचलण्याची कारवाई करण्यात आली. यामुळे पालिका प्रशासनाने नालेसफाईचा केलेला दावा फोल ठरल्याची टीका विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केली आहे.
पालिकेच्या प्रभाग क्रमांक चार कार्यालयांतर्गत धोकादायक असलेली कल्याण-पूर्वेतील करपेवाडी येथील ३ मजली नायर बिल्डिंग या इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित व वित्त हानी झाली नाही. क-प्रभाग क्षेत्र अंतर्गत शिवाजी चौक येथे असलेल्या अति धोकादायक जय हरी इमारत पोकलेन व जेसीबीच्या साह्याने क प्रभाग अधिकारी यांनी त्यांच्या पथकासह निष्काशित केली आहे.
विशेष म्हणजे, पहिल्याच मुसळधार पावसात महापालिका क्षेत्रातील अटाळी, चिकन नगर, बेतुरकर पाडा, जरीमरी या परिसरात पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर तक्रारींवर संबंधित प्रभाग अधिकारी यांनी कामगारांमार्फत पाण्याची विल्हेवाट लावण्याची कारवाई केली. तर डोंबिवलीच्या तुकाराम नगर, ठाकुर्ली पूर्व येथेही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी तातडीने कारवाई सुरू केली होती.
महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी सर्व प्रभाग अधिकारी यांना प्रभाग अंतर्गत पाहणी करून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. जलअभियंता चंद्रकांत कोलते यांना मोठ्या नाल्याची पाहणी करण्याचे आदेश देऊन ते तातडीने साफ करून घेण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाने केलेला नालेसफाईचा दावा अक्षरशा फोल ठरल्याचे दिसून आले आहे.