ठाणे - दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये कुणी सर्वच विषयात 35 मार्क घेतले तर कुणी 100 टक्के मिळवले. परंतु, अंबरनाथ तालुक्यातील रिद्दी व सिद्दीने या निकालात एक आगळावेगळा चमत्कारच घडवला. या दोघी जुळ्या बहिणींनी चक्क सेम टू सेम गुणांची कमाई करुन सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील आंबेशिव नागपाडा येथील रिद्धी व्यापारी आणि सिद्धी व्यापारी या दोघी जुळ्या बहिणी आहे. गावातील साने गुरुजी महाविद्यालयात या दोघी बहिणी शिक्षण घेत आहेत. या दोघींनी 2 विषयात एक सारखेच गुण प्राप्त केले. तर एकूण 84 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. हिंदी आणि इंग्रजी विषयात एक सारखेच गुण प्राप्त केले आहेत. तर इतर विषयात दोघींमध्ये एकेक गुणाचा फरक पडला आहे. मात्र, दोघींनीही एकसारखे गुण प्राप्त करत 84 टक्केपर्यंत मजल मारली आहे.
विशेष म्हणजे या दोघांचीही आर्थिक परिस्थिती बेताची आहे. लहानपणापासूनच दोघींच्या आवडी-निवडी एक सारख्याच असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगतात. दरम्यान, एकाच पुस्तकावर दोघींनी दहावीचा अभ्यास करून यश मिळवले. रिद्दी आणि सिद्दी यांचे यश पाहून अंबरनाथ तालुक्यात या जुळ्या बहिणींची चर्चा होत आहे. दहावीनंतरचे पुढील शिक्षण त्यांना वाणिज्य शाखेत घ्यायचे आहे. तर भविष्यात बँकेत नोकरी करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील या जुळ्या बहिणीच्या दहावीतील यशामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.