ठाणे- दुसरीही मुलगीच जन्माला आल्याने पत्नीसह तान्ह्या मुलीला रुग्णालयातून घरी परत नेण्यास पतीने नकार दिला. मात्र, रुग्णालय प्रशासनाने पोलिसात तक्रार करताच 10 दिवसांनी पोलीस बंदोबस्तात पत्नीसह चिमुकलीला घरी नेण्यात आले. ही घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे.
हेही वाचा- मी नव्हे, फेसबुक फॉलोअर्समध्ये मोदीच नंबर वन! अखेर ट्रम्पनीही केले मान्य
अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली या दुर्गमभागातील आदिवासी पाड्यावर मनीषा चिडा पती, मोठी मुलगी व सासूसह राहते. तिची ५ फेब्रुवारीला घरातच प्रसूती होऊन दुसरीही मुलगीच झाली. मुलीला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मनीषाने मुलीला अंबरनाथ तालुक्यातील मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. परंतु, चिमुकलीची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्याने तिला पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात हलवण्यात आले.
दरम्यान, गेल्या 10 दिवसांपासून मनीषा आपल्या तान्ह्या मुलीसह रुग्णालयात दाखल आहे. मात्र, तिचा पती रुग्णालयात बघायलाही आला नाही. मुलगी झाल्याने पती मला रुग्णालयातून घरी घेऊन जायला येत नाही. 10 दिवसात फक्त एकदा सासू रुग्णालयात आली होती. मात्र, मुलीला न बघता ती निघून गेली, असे मनिषाने रुग्णालयात सांगितले.
रुग्णालय प्रशासनाने हा प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तिच्या सासूला आदिवासी पाड्यातून आणत त्या दोघी माय-लेकीची 10 दिवसांनी रुग्णालयातून सुटका करुन पोलीस बंदोबस्तात घरी नेले. मात्र, याघटनेमुळे आजही वंशाला दिवा म्हणून मुलगा पाहिजे अशी समाजातील काही लोकांची मानसिकता असल्याचे दिसून आले आहे.