ठाणे - येथील रेल्वे स्थानकानजीक राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार अड्यावर नौपाडा पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईमध्ये १ लाख २५ हजारांच्या मुद्देमालासह 83 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, लगेचच त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. याप्रकरणी, नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
ठाणे स्थानकानजीक कृष्णा प्लाझा या चार मजली इमारतीवरील पहिल्या मजल्यावर बेकायदेशीरपणे पत्त्यांचा जुगार सुरु होता. सोमवारी मध्यरात्रीच्या साडेबाराच्या सुमारास पोलिसांनी छापा मारून जुगाऱ्यांसह १ लाख २५ हजारांची रोकड मुद्देमाल हस्तगत केला. हा जुगार अड्डा संगम सोशल चॅरिटेबल ट्रस्ट नावाने सुरु होता.
ट्रस्टतर्फे ट्रस्टच्या सदस्यांसाठी ज्याठिकाणी मनोरंजनाची व्यवस्था केली होती त्याठिकाणी हे जुगारी अवैधरित्या जुगार खेळत होते. याप्रकारे स्वतःच्या फायद्यासाठी अवैध जुगारी हा अड्डा चालवत असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे, नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी सांगितले.