ठाणे - 'ईटीव्ही भारत'ने चार दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील चारही विधानसभा मतदारसघांचा आढावा घेत "शिवसेनेच्या बालेकिल्यात भाजपचा बोलबाला" या मथळ्याखाली सविस्तर बातमी संकेतस्थळावर प्रसिध्द केली होती. आज त्या बातमीचे पडसाद कल्याणच्या शिवसेना शाखेत उमटल्याचे पाहवयास मिळाले.
कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व विधानसभेच्या दोन्ही जांगावर शिवसेने दावा केला आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला न सोडल्यास भाजपविरोधात दोन्ही मतदारसंघातून कल्याण शिवसेना शहर शाखेकडून उमेदवार उभा केला जाईल, अशी माहिती कल्याण शहर शाखेचे शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांनी पत्रकारांना दिली.
यावेळी कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारीसाठी मुलाखत दिलेले इच्छुक उमेदवार विश्वनाथ भोईर, राजेंद्र देवळेकर, रवी पाटील, श्रेयस समेळ, अरविंद मोरे, साईनाथ तारे, मयूर पाटील यांच्यासह कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक असलेले रमेश जाधव, महेश गायकवाड यांच्यासह इतर इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या उमेदवाराला विरोध करीत घोषणाबाजी केली. कोणत्याही परिस्थितीत भाजपशी दोनहात करण्यासाठी सज्ज झाल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - 'शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपचा बोलबाला'
कल्याण शिवसेनेतील दोन्ही मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांपैकी एका उमेदवाराला सर्वानुमते अपक्ष उमेदवार उभा करू आणि कल्याण शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देऊ, अशी डरकाळी यावेळी शिवसैनिकांनी फोडली. यावेळी कल्याण शिवसेना शहर शाखेबाहेर शिवसनेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपला संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली. या राजकीय घडामोडीमुळे शिवसेना भाजपातील युतीच्या फुटीची ठिणगी कल्याणातून फुटणार असून शिवसैनिकांनी भाजपविरोधात एल्गार पुकारला आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली असून कल्याण पश्चिमचे भाजप आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना यंदाची निवडणूक जड जाणार असल्याचे दिसून आले आहे.
हेही वाचा - रणधुमाळी विधानसभेची : निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना करतीय 'क्लस्टर' प्रचार