ठाणे: गणेश दीपक सोनावणे आणि सुमित जाधव असे फरार झालेल्या गुंडांची नावे आहेत. तक्रारदार राज गणपत पवार (वय ४४) यांच्या बहिणीच्या नावे सरकारी रेशन दुकान उल्हासनगर कॅम्प नंबर १ परिसरातील शहाड फाटक येथील याकूब बिल्डींगमध्ये आहे. गेल्या वर्षभरापासून तक्रारदार पवार हे रेशन दुकान चालवत आहे. त्यातच ११ मे रोजी गुरुवारी सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे पवार रेशन दुकान उघडण्यासाठी गेले. यावेळी दुकानासमोरच आधीपासून गुंड गणेश हा उभा होता. दुकान उघडताच गणेशने पवार यांना जर दुकान चालू ठेवायचे असेल तर तुला १० किलो तांदूळ मला द्यावे लागतील, जर दिले नाही तर तुला दुकान उघडू देणार नसल्याची धमकी दिली. परंतु, दुकानदार पवार यांनी गुंडाना आता दुकानात तांदूळ नाही, त्यामुळे देऊ शकत नसल्याचे सांगत तांदूळ देण्यास नकार दिला.
परिसरात उडाला गोंधळ: त्यानंतर गुंड गणेशने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून पवार यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिसरातील नागरिक आणि दुकानातील ग्राहकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. यानंतर गणेश आणि त्याचा साथीदार सुमित दोघेही नागरिकांना चाकूचा धाक दाखवून धमकी देत पसार झाले. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
खंडणीखोर गुंड फरार: घटनेनंतर फिर्यादी राज पवार यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही गुंडांविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही गुंडांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच गुंड फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.
हेही वाचा: