ठाणे - उल्हासनगर किन्नर अस्मिता आणि वाण्य फाऊंडेशनच्या वतीने तृतीयपंथियांच्या कला गुणांना वाव मिळून समाजासमोर आणण्यासाठी रॅम्पवॉक व फॅशन शो, आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. उल्हासनगरमधील एका हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. ठाणे, मुंबईसह विविध शहरातील तृतीयपंथियांनी स्पर्धेत सहभागी होऊन आपल्यामधील कला सादर केल्या. या वेळी, तृतीयपंथियांमधील बहुतांश प्रत्येकाच्या अंगी विविध कलागुण असल्याचे समोर आले.
हेही वाचा - सिंधुदुर्ग : शाॅर्ट सर्किटमुळे आग लागून कलम बागेचे मोठे नुकसान
लावणीवर तृतीयपंथियांचा लाजवाब नजराणा
मराठमोळ्या विविध प्रसिद्ध लावण्यांवरही अनेक तृतीयपंथियांनी एकापेक्षा एक नृत्य करत रसिकांची मने जिंकली. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत फॅशन शोनंतर लावणीला सर्वाधिक तृतीयपंथियांनी पसंती दिली होती.
विविध मान्यवरांच्या उपस्थित समारोप
या फॅशन शो, नृत्य स्पर्धेच्या समारोपाला उल्हासनगरचे आमदार कुमार अयलानी, स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी हजर होते. विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या तृतीयपंथियांना मानसन्मान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा - हुतात्मा जवान अमित पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार